अखेर त्या आदमखोर बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद
तिरोडा तालुक्यातील खडकी–डोंगरगाव परिसरात मागील काही दिवसांपासून भीतीचं वातावरण पसरलेलं होतं.

अखेर त्या आदमखोर बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद
प्रविण शेंडे जिल्हा प्रतिनिधी, गोंदिया
तिरोडा तालुक्यातील खडकी–डोंगरगाव परिसरात मागील काही दिवसांपासून भीतीचं वातावरण पसरलेलं होतं. दि. 9 जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास खडकी डोंगरगाव येथील एका चार वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्या निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण गावासह आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती.
या घटनेमुळे गावातील नागरिक भयभीत झाले होते. अनेक पालकांनी आपल्या लहान मुलांना शाळेत पाठवणं बंद केलं होतं. शेतात जाणं, सकाळ-संध्याकाळ बाहेर पडणं देखील लोकांनी टाळायला सुरुवात केली होती. विशेषतः महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिक यांच्यामध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावणे, परिसरात गस्त वाढवणे, रात्रीच्या वेळेस सर्च ऑपरेशन राबवणे असे विविध उपाय वनविभागाने सुरू केले. जवळपास नऊ दिवस दिवस-रात्र मेहनत करून अखेर त्या हिंसक आणि आदमखोर बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलं.
या संपूर्ण कालावधीत वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर मोठा ताण होता. नागरिकांचा संताप, भीतीचं वातावरण आणि पुन्हा कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी कर्मचारी अहोरात्र काम करत होते. अखेर बिबट्याला पकडण्यात आल्यानंतर गावकऱ्यांनी थोडा सुटकेचा श्वास घेतला आहे.
वनविभागाच्या या कार्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून, पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.
प्रविण शेंडे जिल्हा प्रतिनिधी, गोंदिया




