पाणीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भशेत रस्तेशेतकरीशेतकरी आत्महत्याशेतीशेती न्यूजसरकारी योजनासिंदखेड राजा

ढगाळ वातावरणाचा गव्हाला फटका; शेतकरी पुन्हा संकटात

सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा परिसरात गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये

ढगाळ वातावरणाचा गव्हाला फटका; शेतकरी पुन्हा संकटात

         प्रतिनिधी : वाघाळा | योगेश काकड

सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा परिसरात गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून रब्बी हंगामात मोठ्या क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आली. सुरुवातीला गव्हाचे पीक जोमात वाढत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण, वाढलेली आर्द्रता व वाऱ्याचा वेग यामुळे गव्हाच्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा धास्तावले आहेत.

दीपावलीपर्यंत झालेल्या अवकाळी व सततच्या पावसाचा फटका आधीच शेतकऱ्यांना बसला होता. आता पीक भरात येण्याच्या टप्प्यावर असताना ढगाळ हवामानामुळे गव्हावर करपा, तांबेरा तसेच बुरशीजन्य रोग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे गहू आडवा पडत असल्याचे चित्र असून त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने, वाढत्या खर्चाला सामोरे जात गव्हाची लागवड केली. बियाणे, खत, औषधे आणि सिंचन यावर मोठा खर्च झाला आहे. अशा परिस्थितीत पीक हातात येण्याआधीच निसर्गाचा प्रतिकूल लहरीपणा शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेणार की काय, अशी भावना शेतकरी बोलून दाखवत आहेत.

शेतकरी पुन्हा संकटात?

हवामानातील सततचे बदल, ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता गहू उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत. जर येत्या काळात सूर्यप्रकाश कमी राहिला आणि आर्द्रता वाढत राहिली, तर रोगांचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो. यामुळे उत्पादन घटण्याबरोबरच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडण्याची शक्यता आहे.

आधीच कर्जबाजारीपणाला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंताजनक असून शासनाने वेळीच कृषी सल्ला, रोगनियंत्रणासाठी मार्गदर्शन व संभाव्य नुकसानभरपाईबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

निसर्गाच्या अवकृपेमुळे मेहनतीचे पीक हातातून निसटणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर उभा राहिला असून वाघाळा परिसरातील शेतकरी भविष्यातील परिस्थितीकडे चिंतेने पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!