दुसरबीडला राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथी भक्तिभावात व उत्साहात साजरी
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे राष्ट्रसंत भगवान बाबा

दुसरबीडला राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथी भक्तिभावात व उत्साहात साजरी
प्रा. दिलीप नाईकवाड, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तीभावात व उत्साहात पार पडले. वार्ड क्रमांक एकमधील भगवान बाबा नगर येथे आयोजित या पुण्यतिथी सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
राष्ट्रसंत भगवान बाबा हे वारकरी संप्रदायातील थोर संत असून त्यांनी आयुष्यभर समाजात सदाचार, नामस्मरण, निस्वार्थ सेवा व सामाजिक एकोपा यांचा जागर केला. त्यांच्या विचारांनी ग्रामीण भागात आजही अध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांचे संस्कार रुजले असून दुसरबीड परिसरात भगवान बाबा हे श्रद्धेचे केंद्र मानले जाते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी भाविक मोठ्या भक्तिभावाने येथे एकत्र येतात.
पुण्यतिथी सोहळ्याच्या पहिल्या दिवशी ह.भ.प. सुदाम महाराज पानेगावकर यांचे कीर्तन झाले. आपल्या कीर्तनातून त्यांनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत नामस्मरणाचे महत्त्व, सदाचाराची वाट आणि समाजात एकोप्याने जगण्याचा संदेश उपस्थित भाविकांना दिला. त्यांच्या सडेतोड व भावस्पर्शी वाणीतून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
दुसऱ्या दिवशी ह.भ.प. अनिल महाराज चेके यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. काल्याच्या कीर्तनात भक्तांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
महाप्रसादाने या पुण्यतिथी सोहळ्याची भक्तीपूर्ण वातावरणात सांगता झाली. या दोन दिवसीय कार्यक्रमामुळे दुसरबीड परिसरात अध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले असून राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजात सदाचार व सद्भाव जपण्याचा संकल्प भाविकांनी व्यक्त केला.




