मुत्रीघर व गोडाऊन रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे लेखी आश्वासन; आमरण उपोषणाची सांगता
मलकापूर पांग्रा येथे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक मुत्रीघर तसेच खरेदी-विक्री संघाच्या

मुत्रीघर व गोडाऊन रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे लेखी आश्वासन; आमरण उपोषणाची सांगता
मलकापूर पांग्रा | प्रतिनिधी, भगवान साळवे
मलकापूर पांग्रा येथे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक मुत्रीघर तसेच खरेदी-विक्री संघाच्या गोडाऊनकडे जाणाऱ्या सुमारे २० फूट रुंद सार्वजनिक रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या अतिक्रमणाविरोधात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते शेख हनिफ बागवान यांनी प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत सचिवालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
बस स्थानक परिसरात असलेले सार्वजनिक मुत्रीघर व गोडाऊनकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता अतिक्रमणामुळे पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे महिला, वृद्ध, प्रवासी तसेच व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर रस्ता तात्काळ अतिक्रमणमुक्त करून नागरिकांसाठी खुला करावा, या मागणीसाठी शेख हनिफ बागवान यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ग्रामसचिवालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली.
या उपोषणाची दखल घेत गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी उपोषणकर्त्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. त्यांनी अतिक्रमण प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया राबवून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी उद्धव गायकवाड यांनी तात्काळ लेखी पत्र देत, एका महिन्याच्या आत कायदेशीर कारवाई पूर्ण करून आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षण घेऊन संबंधित रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकण्यात येईल व रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.
प्रशासनाच्या या लेखी आश्वासनानंतर सामाजिक कार्यकर्ते शेख हनिफ बागवान यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नींबू शरबत पाजून आमरण उपोषणाची औपचारिक सांगता करण्यात आली.
यावेळी गुलशेर खासाब, माजी उपसरपंच भगवान साळवे, माजी ग्रामपंचायत सदस्य अजहरखा पठाण, भगवान गावंडे, ग्रामपंचायत सदस्य राजू साळवे, अर्जुन मगर, मुबारक पठाण, ग्रामपंचायत सदस्य नामदेव उगले, माजी सरपंच बंडू उगले, मन्नान कुरेशी, गोपी टाले, शरद आटोळे, अंबादास टाले, बीट जमादार निवृत्ती पोफळे, मंडळ अधिकारी प्रेमानंद वानखेडे, तलाठी प्रभाकर बाविस्कर, पत्रकार पवन मगर, डॉ. गंगाराम उबाळे, फकीरा पठाण यांच्यासह गावातील शेकडो नागरिक उपोषण मंडपात उपस्थित होते.
नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची वेळेत अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली असून, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.




