तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रात सावित्रीच्या विचारांचा जागर; महिला संघटनाचा बुलंद आवाज
स्त्री शिक्षणाचा दीप पेटवणाऱ्या, अन्यायाविरोधात निर्भीडपणे उभ्या राहिलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रात सावित्रीच्या विचारांचा जागर; महिला संघटनाचा बुलंद आवाज
सिंदखेड राजा / प्रतिनिधी – अनिल दराडे
स्त्री शिक्षणाचा दीप पेटवणाऱ्या, अन्यायाविरोधात निर्भीडपणे उभ्या राहिलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती तांदुळवाडी येथील अंगणवाडी केंद्रात ३ जानेवारी २०२६ रोजी अतिशय उत्साहपूर्ण आणि विचारप्रवर्तक वातावरणात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम केवळ जयंतीपुरता मर्यादित न राहता महिलांच्या स्वाभिमान, शिक्षण आणि हक्कांवर चिंतन करणारा ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवखेड येथील सुप्रसिद्ध समाजसेविका, उमेद अंतर्गत आयसीआरपी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका तथा राज्यस्तरीय राष्ट्रमाता जिजाऊ नारीशक्ती सन्मान पुरस्कारप्राप्त सौ. रेवती सुंदरराव आढाव उपस्थित होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच (रूम्हणा) व प्राध्यापिका सौ. धनश्री शिवराज कायंदे, भगवानबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व ग्रामपंचायत सदस्य श्री. शिवराज तोताराम कायंदे, चांगेफळ येथील सौ. संघमित्रा समाधान तायडे तसेच श्रीमती साधनाताई घनश्याम मोगल यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात शालेय विद्यार्थिनी आराध्या मोगल हिने सावित्रीबाईंच्या संघर्षमय जीवनावर सडेतोड विचार मांडत आजच्या काळातही महिलांवर होणाऱ्या अन्यायांविरोधात सजग राहण्याचे आवाहन केले. शासकीय मदत क्रमांक, पोलीस हेल्पलाईन व आपत्कालीन सेवांची माहिती देत तिने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा प्रभावीपणे मांडला.
यावेळी श्रीमती साधना मोगल यांनी वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष कथन करत, पतीच्या निधनानंतर दोन मुलांना शिक्षण देत स्वाभिमानाने उभे राहिल्याची प्रेरणादायी कहाणी सांगितली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर वाटचाल करत मुलांना घडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सौ. संघमित्रा तायडे यांनी जुन्या काळातील स्त्री शिक्षणावरील बंधने, आजची नोकरी करणारी स्त्री, तिचे कायदेशीर अधिकार व कर्तव्ये यावर सखोल मार्गदर्शन केले.
“आजही परवानगीची साखळी तुटलेली नाही” – सौ. रेवती आढाव
अध्यक्षीय भाषणात सौ. रेवती आढाव यांनी सावित्रीबाईंच्या कार्यामुळे महिलांना मिळालेल्या संधींचा आढावा घेतला. मात्र, “ज्या सावित्रीने अपमान सहन करून स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग दाखवला, त्यांच्याच जयंतीला येण्यासाठी आजही महिलांना परवानगी घ्यावी लागते, ही मोठी शोकांतिका आहे,” असे परखड मत त्यांनी मांडले. महिलांनी संघटित होऊन मानसिक गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ या अभियानांतर्गत तांदुळवाडी गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली. “मुलगी वाचवा – मुलगी शिकवा”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. रॅलीत अंगणवाडी सेविका-मदतनीस, विद्यार्थी, मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियोजनबद्ध आणि अथक प्रयत्नांमुळे हा प्रेरणादायी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.




