येवला तालुक्यात मा. ना. आ. मंत्री छगनरावजी भुज
मा. खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न

येवला तालुक्यात मा. ना. आ. मंत्री छगनरावजी भुबळ व मा. खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न
नाशिक | येवला प्रतिनिधी : प्रविण पाटील
येवला तालुक्यातील ग्रामपंचायत चिचोंडी बुद्रुक येथे माननीय ना. आ. मंत्री छगनरावजी भुजबळ व माननीय खासदार समीर भुजबळ यांच्या शुभहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका तसेच भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अभ्यासिका यांचे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच नावीन्यपूर्ण अभ्यासिका इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत चिचोंडी बुद्रुकच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. कल्पनाताई चांगदेव शिंदे होत्या. यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. माननीय खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते अभ्यासिकेचे फीतकापण करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जनतेतून निवडून आलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजूभाऊ लोणारी, मार्केट कमिटीचे सभापती वसंतराव पवार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, भुजबळ साहेबांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, महेश पैठणकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकृष्ण सोनवणे, नितीन गायकवाड, देविदास निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मुख्याध्यापक कानिफनाथ मढवई सर यांनी केले. त्यांनी ग्रामपंचायत हद्दीतील सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांचे सविस्तर वाचन केले. तसेच चिचोंडी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करताना गाव सुजलाम–सुफलाम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी बोलताना माननीय खासदार समीर भुजबळ यांनी ग्रामपंचायत चिचोंडी बुद्रुकच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, मूलभूत सोयीसुविधा वाढवणे तसेच रस्ते, पाणीपुरवठा योजना, नदी–नाला जोड प्रकल्प व बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
सरपंच सौ. कल्पनाताई शिंदे, उपसरपंच राणी गुंजाळ तसेच ग्रामपंचायत सदस्य नेहा भूषण गोठी, भामाबाई सूर्यवंशी, रंजना मोरे, मोनाली मढवई, मीराबाई उबाळे यांच्या उपस्थितीत विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आबा महाराज खराटे व मनोज गायकवाड यांनी गावातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी प्रस्ताव सादर केले.
कार्यक्रमाच्या शेवटी महेश पाटील सर यांनी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ तसेच अभ्यासिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आभार मानले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्यांसह अर्जुन मढवई, पोपटराव पवार, नारायण खराटे, राजेंद्र मढवई, माजी सरपंच मच्छिंद्र मढवई, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ग्रामपंचायत चिचोंडी बुद्रुक येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी गावातच अभ्यासाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या अभ्यासिकांची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी ग्रामविकास अधिकारी योगेश पाटील तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.




