वाशिम जिल्ह्यात ‘लाडकी बहीण’ योजनेचा खोळंबा; सुमारे ५० टक्के महिला अनेक हप्त्यांपासून वंचित
राज्य शासनाची महिलांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी

वाशिम जिल्ह्यात ‘लाडकी बहीण’ योजनेचा खोळंबा; सुमारे ५० टक्के महिला अनेक हप्त्यांपासून वंचित
वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे
राज्य शासनाची महिलांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दिलासादायक ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना वाशिम जिल्ह्यात मोठ्या तांत्रिक अडचणींमुळे अडचणीत सापडली आहे. ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका, अपुरे प्रशिक्षण आणि घाईघाईत राबवलेली नोंदणी यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के पात्र महिलांना नोव्हेंबर २०२५ चा १,५०० रुपयांचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शासनाने सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी बंधनकारक केली होती. मात्र ही प्रक्रिया राबवताना अनेक ठिकाणी संगणक परिचालकांना आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात त्रुटी झाल्या. आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक आदी तपशील चुकीच्या पद्धतीने नोंदवले गेले. परिणामी अनेक पात्र महिलांची नोंद अपूर्ण राहिली असून प्रणालीने त्यांना ‘अपात्र’ ठरवले आहे.
नोव्हेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा न झाल्याने वाशिम जिल्ह्यातील शेकडो महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन खर्चासाठी या योजनेवर अवलंबून असलेल्या महिलांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी महिला दररोज तालुका महिला व बालविकास कार्यालय, तहसील कार्यालय तसेच विविध सेवा केंद्रांमध्ये चौकशीसाठी गर्दी करत आहेत. मात्र सध्या यासाठी कोणतीही ठोस आणि तत्काळ कार्यान्वित होणारी यंत्रणा उपलब्ध नसल्याने महिलांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. अनेक महिलांनी दिवसभर कामधंदा सोडून कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे.
‘लाडकी बहीण’ योजना केवळ कागदोपत्री यशस्वी दाखवण्याऐवजी प्रत्यक्ष महिलांच्या खात्यात लाभ जमा होणे गरजेचे असल्याची ठाम भूमिका लाभार्थी महिलांनी मांडली आहे. प्रशिक्षित शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत पुन्हा एकदा ई-केवायसी प्रक्रिया राबवून सर्व तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात आणि प्रलंबित हप्ते तातडीने खात्यात जमा करावेत, अशी जोरदार मागणी वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांकडून केली जात आहे.
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन विशेष दुरुस्ती मोहीम राबवावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही काही महिला लाभार्थींनी दिला आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ वेळेत आणि पूर्णपणे मिळावा, हीच वाशिम जिल्ह्यातील हजारो महिलांची अपेक्षा आहे.




