अपघातक्राइमनिधन वार्ताबुलढाणामहाराष्ट्रयुवालोणारविदर्भशहीदशाळे कॉलेजशेतकरीहॉस्पिटल

मदतीनंतरही नियतीपुढे पराभव… शेतकरी कुटुंबातील होतकरू डॉक्टर गणेश ज्ञानेश्वर मोरे यांचे दुःखद निधन

शेतकरी कुटुंबासाठी आणि एका होतकरू डॉक्टरच्या आयुष्यासाठी समाजाने एकत्र येत दिलेली मदतीची हाक अखेर अपयशी ठरली.

मदतीनंतरही नियतीपुढे पराभव… शेतकरी कुटुंबातील होतकरू डॉक्टर गणेश ज्ञानेश्वर मोरे यांचे दुःखद निधन

         जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ आघाव लोणार

शेतकरी कुटुंबासाठी आणि एका होतकरू डॉक्टरच्या आयुष्यासाठी समाजाने एकत्र येत दिलेली मदतीची हाक अखेर अपयशी ठरली. अत्यंत दुःखद आणि वेदनादायी मनाने ही बातमी द्यावी लागत आहे की, डॉक्टर गणेश ज्ञानेश्वर मोरे यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे.

भूमराळा, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असलेले गणेश मोरे हे अत्यंत गरीब, अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील एकुलते एक सुपुत्र होते. दुर्दैवी अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानंतर त्यांच्यावर प्रथम नाशिक येथे उपचार करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

संभाजीनगर येथे त्यांनी दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेतले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र अपेक्षित सुधारणा दिसून आली नाही. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील जे.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जे.जे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनीही संपूर्ण सहकार्य करत वैद्यकीय उपचार केले; मात्र रुग्णाच्या प्रकृतीत फारशी सुधारणा होत नसल्याचे स्पष्ट झाले.

या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार “रुग्णाला घराजवळ ठेवा” असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गणेश मोरे यांना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे अखेरच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुर्दैवाने मेहकर येथे उपचार सुरू असतानाच गणेशची प्राणज्योत मालवली.

गणेश मोरे हे सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय, नाशिक येथे B.A.M.S. चे शिक्षण घेत असलेले होतकरू विद्यार्थी होते. शिष्यवृत्तीच्या आधारावर शिक्षण घेत असलेला हा तरुण डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचे स्वप्न पाहत होता. निसर्गाच्या मारहाणीने आधीच खचलेल्या शेतकरी कुटुंबासाठी हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच कायमचे हरपले.

या संपूर्ण संघर्षात समाजाने, शेतकरी बांधवांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी कष्टाने दिलेला एक-एक रुपया मदतीसाठी जमा झाला. लोकांनी मनापासून सहकार्य केले; मात्र दुर्दैवाने त्या मदतीचा अपेक्षित परिणाम होऊ शकला नाही. तरीही या मदतीमागे असलेली माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक एकोपा कधीही विसरता येणार नाही.

आज एका शेतकरी कुटुंबाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले असून संपूर्ण भूमराळा गावासह परिसर शोकसागरात बुडाला आहे. या कठीण प्रसंगी मदतीसाठी पुढे आलेल्या सर्व दानशूर व्यक्ती, शेतकरी बांधव, नागरिक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचे कुटुंबीयांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

महत्त्वाची सूचना

डॉक्टर गणेश ज्ञानेश्वर मोरे यांचा रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम दिनांक 6 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मूळ गावी – भूमराळा (ता. लोणार, जि. बुलढाणा) येथे होणार आहे. याची सर्व नातेवाईक, ग्रामस्थ व नागरिकांनी नोंद घ्यावी.

डॉक्टर गणेश ज्ञानेश्वर मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!