अखेर ‘शेतकरी न्यूज लाईव्ह’चा दणका – शेतकरी नेत्यांच्या एकजुटीपुढे प्रशासन झुकले, तालुका कृषी अधिकारी तात्काळ निलंबित
शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात उठलेला आवाज अखेर निर्णायक ठरला

अखेर ‘शेतकरी न्यूज लाईव्ह’चा दणका – शेतकरी नेत्यांच्या एकजुटीपुढे प्रशासन झुकले, तालुका कृषी अधिकारी तात्काळ निलंबित
वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे
शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात उठलेला आवाज अखेर निर्णायक ठरला. मंगरुळपीर तालुक्यात शेतकऱ्यावर शासकीय अधिकाऱ्याने केलेल्या हल्ल्याप्रकरणी ‘शेतकरी न्यूज लाईव्ह’ने सातत्याने लावून धरलेला दणका, तसेच बुलढाणा जिल्ह्याचे शेतकरी नेते आदरणीय रविकांत भाऊ तुपकर यांनी ठामपणे उचललेला प्रश्न, यामुळे अखेर प्रशासनाला झुकावे लागले असून तालुका कृषी अधिकारी सचिन भास्कर कांबळे यांना राज्य शासनाने तात्काळ निलंबित केले आहे.
मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीच्या थकीत अनुदानाबाबत विचारणा करणाऱ्या गोगरी (ता. मंगरुळपीर) येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांच्यावर तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने मारहाण केल्याचा प्रकार समोर येताच संतापाची लाट उसळली. अनेक स्तरावर हा विषय दडपण्याचे प्रयत्न झाले, मात्र शेतकऱ्यांचा आवाज दाबता येत नाही, हे या प्रकरणातून पुन्हा सिद्ध झाले.
या अन्यायाविरोधात बुलढाणा जिल्ह्याचे शेतकरी नेते आदरणीय रविकांत भाऊ तुपकर यांनी ठाम भूमिका घेत हा प्रश्न लावून धरला.
तसेच शेतकरी योद्धा कृती समितीच्या माध्यमातून आणि ‘शेतकरी न्यूज लाईव्ह’च्या निर्भीड पत्रकारितेतून हा विषय सातत्याने शासनाच्या दारापर्यंत नेण्यात आला.
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला, शेतकरी संघटना एकवटल्या, रस्त्यावरचा संताप सरकारपर्यंत पोहोचला आणि ‘शेतकरी न्यूज लाईव्ह’ने बातम्यांची मालिका चालवत प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण केला.
या एकत्रित दबावामुळे आयुक्त (कृषी), महाराष्ट्र राज्य यांनी शासनाकडे निलंबनाची शिफारस केली आणि अखेर १७ जानेवारी रोजी राज्य शासनाला तात्काळ कारवाई करावी लागली.
हा निर्णय म्हणजे केवळ एका अधिकाऱ्यावरील कारवाई नाही, तर
शेतकरी एकवटला तर सत्तेची दारे उघडावीच लागतात
शेतकरी नेते, संघटना आणि निर्भीड माध्यमे एकत्र आली की अन्याय टिकत नाही
याचा स्पष्ट संदेश आहे.
शेतकऱ्याच्या सन्मानासाठी उभी राहिलेली एकजूट आणि ‘शेतकरी न्यूज लाईव्ह’सारख्या माध्यमाचा दणका — हाच या लढ्याचा खरा विजय आहे.




