फुलसावंगीत पत्रकार दिनानिमित्त मार्गदर्शनपर व्याख्यानांची मेजवानी ‘बेधुंदकार’ गोविंद पोलांड व प्रा. निरंजन राठोड यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून

फुलसावंगीत पत्रकार दिनानिमित्त मार्गदर्शनपर व्याख्यानांची मेजवानी
‘बेधुंदकार’ गोविंद पोलांड व प्रा. निरंजन राठोड यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
यवतमाळ प्रतिनिधी / विक्की भिसे
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून फुलसावंगी पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थी व पालकांसाठी एक विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार दिनानिमित्त सामाजिक उत्तरदायित्व जपत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता, स्व. सुधाकरराव नाईक कला व विज्ञान महाविद्यालय, फुलसावंगी येथे आयोजित करण्यात आला आहे. या व्याख्यान सत्रात प्रसिद्ध व्याख्याते व विचारवंत ‘बेधुंदकार’ गोविंद पोलांड आणि शिक्षण क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक प्रा. निरंजन राठोड हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महागावचे तहसीलदार अभय मस्के, महागाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनराज निळे, उपसरपंच कुणाल नाईक, तसेच डॉ. पुंडलिक आमले, डॉ. चंदन पांडे, प्रा. सुरेश राठोड, प्रा. विनोद राठोड, प्रा. सुधीर भाटे व प्रा. संदीप चंद्रवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय प्रशासकीय अधिकारी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
सध्याच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर निवड, जीवनातील आव्हाने आणि आत्मविश्वास याबाबत योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ‘बेधुंदकार’ गोविंद पोलांड यांची प्रभावी, वास्तववादी आणि प्रेरणादायी मांडणी विद्यार्थ्यांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यास प्रवृत्त करेल, तर प्रा. निरंजन राठोड यांचे शैक्षणिक आणि करिअरविषयक मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन फुलसावंगी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.




