मंगरूळपीर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १४ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त
मंगरूळपीर शहरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलत

मंगरूळपीर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १४ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त
वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे
मंगरूळपीर शहरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलत मानोरा रोडवरील एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली. दिनांक ६ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अचानक छापा टाकताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत अंदाजे चौदा लाख चौसष्ट हजार आठशे रुपये इतकी असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या आदेशान्वये पार पडली असून उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगरूळपीर पोलिसांनी ही मोहीम यशस्वी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यांच्यासह पोलीस कर्मचारी राम राऊत, रफिक मांजरे, शकील मुन्नीवाले, प्रमोद वानखडे आणि अनंता डोळसे यांनी या कारवाईत प्रत्यक्ष सहभाग घेतला.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. पोलिसांच्या या अचानक आणि धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार व इतर बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.




