भुमराळा–किनगाव जट्टू रस्त्याचं नशीब बदललं; खड्ड्यांच्या पूजनानंतर कामाला वेग

इम्पॅक्ट स्टोरी – शेतकरी न्यूज
भुमराळा–किनगाव जट्टू रस्त्याचं नशीब बदललं; खड्ड्यांच्या पूजनानंतर कामाला वेग
रघुनाथ आघाव – बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
भुमराळा ते किनगाव जट्टू या मार्गावरचा रस्ता कित्येक दिवसांपासून खड्ड्यांनीच व्यापलेला. नागरिकांच्या तक्रारी, जनतेचे अर्ज, फोन – काहीच फरक पडत नव्हता. पण याच रस्त्यावर गेल्या दोन दिवसांत अनोखं चित्र पाहायला मिळालं.
भाजपा जिल्हाध्यक्ष (सोशल मीडिया) देवानंद सानप यांनी थेट रस्त्यावर उतरून, गावकऱ्यांसह गणपती बाप्पाची आरती म्हणत खड्ड्यांचे पूजन केले. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरची चीड, संताप आणि निराशा… सगळं आंदोलनात ओसंडून वाहत होतं.
शेतकरी न्यूजने या अनोख्या आंदोलनाची बातमी पहिल्याच दिवशी जोरात प्रसारित केली.
मग काय, गावात चर्चा सुरू –
“खड्ड्यांना आरती केली तरच सरकार जागं होतं का?”
या चर्चेचा परिणाम एवढा मोठा झाला की, ठेकेदार आणि प्रशासनाची पळापळ सुरू झाली.
एकीकडे लोक सोशल मीडियावर आंदोलनाची बातमी तुफान व्हायरल करत होते, तर दुसरीकडे विभागीय अधिकाऱ्यांना लोकांचा थेट दबाव जाणवत होता.
आणि अखेर…
आंदोलनाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी रस्त्याचं डांबरीकरण सुरू!
सकाळी मशीनरी आली, खडी आणि डांबराचे ढिग जमले, कामगार रस्त्यावर सरसावले…
गावकऱ्यांची वर्षानुवर्षे असलेली मागणी प्रत्यक्षात पूर्ण होताना दिसली.
ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत म्हटलं—
“आम्ही तर आशाच सोडली होती. पण या आंदोलनानं वाट मोकळी केली.”
देवानंद सानप यांनीही प्रतिक्रिया देताना सांगितलं—
“जनतेचा आवाज दाबता येत नाही. रस्ता कोणासाठी? जनतेसाठीच. म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरलो.”
या संपूर्ण प्रकरणात गावचे नागरिक, तरुण, महिला, कार्यकर्ते – सगळेच मोठ्या संख्येने सहभागी झाले.
त्यांच्या एकजुटीने आणि शेतकरी न्यूजच्या प्रभावी बातमीमुळे रस्ता दुरुस्तीचं काम गतीने सुरू झालं आहे.
गावकऱ्यांची पुढील मागणी स्पष्ट—
“काम सुरू झालंय, पण दर्जेदार
झालं पाहिजे. रस्ता टिकला पाहिजे.”




