अपघातएक्सीडेंटक्राइमगडचिरोलीट्रॅक्टर अपघातपोलीसमहाराष्ट्रविदर्भसोशल मीडियाहॉस्पिटल

देवदर्शनावरून परतताना भीषण अपघात; रस्ते, वाहतूक नियोजन व आपत्कालीन व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

बुलेरो–ट्रकची जबरदस्त धडक; चालक कोमात, 9 जण गंभीर जखमी – नागरिकांत तीव्र संताप

देवदर्शनावरून परतताना भीषण अपघात; रस्ते, वाहतूक नियोजन व आपत्कालीन व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

बुलेरो–ट्रकची जबरदस्त धडक; चालक कोमात, 9 जण गंभीर जखमी – नागरिकांत तीव्र संताप

      जिल्हा प्रतिनिधी : तेजेश गुज्जलवार

अहेरी : छलेवाडा येथून मेडाराम येथे देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनावर काळाने घाला घातला. बुलेरो (MH 33 A 3955) आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात बुलेरो चालक वसंत चव्हान हे कोमात गेले असून वाहनातील आणखी नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अपघात इतका भीषण होता की बुलेरो वाहनाचा समोरचा भाग अक्षरशः चुराडा झाला. काही प्रवासी वाहनात अडकून पडले होते. मात्र अपघातानंतर घटनास्थळी तातडीची मदत यंत्रणा वेळेवर पोहोचली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. स्थानिक नागरिकांनीच जीव धोक्यात घालून जखमींना वाहनातून बाहेर काढले व प्राथमिक मदत केली. रुग्णवाहिका उशिरा दाखल झाल्याने प्रशासनाच्या आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेची पोलखोल झाली आहे.
या मार्गावर अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना राबवण्यात आलेली नाही, अशी तीव्र नाराजी स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. खराब रस्ते, अपुरी दिशादर्शक व चेतावणी फलक, अंधारात दिसणार नाहीत असे वळण, वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी अनुपस्थिती आणि अवजड वाहनांचा बेफिकीर वेग हे अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे या रस्त्यावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून, काहींना जीवही गमवावा लागला आहे. तरीदेखील संबंधित विभागांकडून केवळ पाहणी आणि आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कृती झालेली नाही. “आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
जखमींना तातडीने भूपनपाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू असला तरी अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर आणि जबाबदार यंत्रणांवर कारवाई होणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संबंधित मार्गाची तात्काळ दुरुस्ती, वेगमर्यादेची कठोर अंमलबजावणी, अपघातप्रवण ठिकाणी सीसीटीव्ही व गतिरोधक बसवणे, पुरेशी संकेतचिन्हे लावणे आणि कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रण यंत्रणा उभारण्याची ठोस मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!