मंगरुळपीर येथे मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार वर्धापनदिन उत्साहात साजरा
मंगरुळपीर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात दि. ३१ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब

मंगरुळपीर येथे मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार वर्धापनदिन उत्साहात साजरा
वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे
मंगरुळपीर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात दि. ३१ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक ‘मूकनायक’ या पाक्षिकाच्या १०६ व्या पत्रकार वर्धापनदिनानिमित्त भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सामाजिक न्याय, समता आणि सत्यासाठी झटणाऱ्या पत्रकारितेचा गौरव करणारा हा कार्यक्रम दुपारी ठीक १ वाजता सुरू झाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करत मूकनायकच्या ऐतिहासिक योगदानाला उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगरुळपीर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अशोक परळीकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुधाकर चौधरी आणि रमेश मुंजे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांनी आपल्या मनोगतातून मूकनायक या वृत्तपत्राच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित, वंचित आणि उपेक्षित समाजाला दिलेल्या आवाजाचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या काळात पत्रकारितेवर अनेक प्रकारचे दबाव असतानाही सत्य, न्याय आणि सामाजिक जबाबदारी जपणे हीच खरी आंबेडकरी पत्रकारिता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
“मूकनायकने मुक्यांना आवाज दिला; आजही पत्रकारांनी निर्भयपणे अन्यायाविरुद्ध उभे राहत समाजपरिवर्तनाची भूमिका बजावली पाहिजे,” असे स्पष्ट मत यावेळी मांडण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या दि. २८ जानेवारी रोजी विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले. यानिमित्त उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून मौन पाळत श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमास पत्रकार रमेश मुंजे, नाना देवळे, नारायण आव्हाळे, संदीप कांबळे, राजकुमार ठाकुर, सुधाकर क्षीरसागर, सुधाकर चौधरी, अमोल ठाकुर, गोपाल खिराडे, सुनील भगत, वसंत इंगोले, फुलचंद भगत तसेच सामाजिक कार्यकर्ते फकीरा श्रुंगारे, सुदाम मनवर, प्रेमकुमार इंगोले, उत्तम भगत आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार संदीप कांबळे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन सुधाकर चौधरी यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडत मूकनायकच्या विचारांचा जागर पुन्हा एकदा करण्यात आला.



