तळेगाव बाजार येथील केळीची थेट इराणला निर्यात
तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक व दिलासादायक घडामोड

तळेगाव बाजार येथील केळीची थेट इराणला निर्यात
तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक व दिलासादायक घडामोड
तेल्हारा तालुका प्रतिनिधी ,राजेश पाटील खारोडे
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथे शेतकऱ्यांसाठी अभिमानास्पद व प्रेरणादायी अशी घटना घडली असून, दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी येथील प्रगतशील शेतकरी सदन कास्तकार श्री. विलासराव जनार्दन खारोडे यांच्या बागेतील केळीची थेट इराण देशात यशस्वी निर्यात करण्यात आली. ही निर्यात केवळ एका शेतकऱ्यापुरती मर्यादित नसून, संपूर्ण तळेगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक व आशादायी ठरली आहे.
योग्य नियोजन, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि कृषी विभागाचे वेळेवर मार्गदर्शन यामुळे ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात शक्य झाली. परदेशी बाजारपेठेत तळेगाव बाजार परिसरातील केळीला चांगली मागणी निर्माण झाल्याने भविष्यात इतर शेतकऱ्यांनाही निर्यातीच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास कृषी विभागाने यावेळी व्यक्त केला.
या संपूर्ण निर्यात प्रक्रियेसाठी तेल्हारा तालुका कृषी अधिकारी श्री. बडवे साहेब, मंडळ कृषी अधिकारी श्री. गौरव राऊत साहेब, कृषी सहाय्यक श्री. मनोज सारभुकन साहेब, श्री. सुधीर जनार्धनराव खारोडे, तसेच कृषी उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त श्री. सचिन कोरडे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. शेतकऱ्याला निर्यातीसाठी आवश्यक असलेले दर्जा निकष, पॅकिंग, साठवणूक व वाहतूक याबाबत योग्य माहिती व मदत देण्यात आली.
या यशस्वी निर्यातीमुळे तळेगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शेती केवळ स्थानिक बाजारापुरती न ठेवता जागतिक बाजारपेठेतही नेता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ही बाब परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
यावेळी गावातील व परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. त्यामध्ये गुणवंतराव खारोडे, रामदास खारोडे, ओंकारराव ठोंबरे, सदानंद खारोडे, उद्धवराव मानखैर, रामकृष्ण खारोडे, प्रविण खारोडे, गोपाळराव टापरे, बाबुराव अ. खारोडे (शिक्षक), बंडुभाऊ खारोडे, अशोकराव डिक्कर, दिलीपराव खारोडे, माजी पंचायत समिती सदस्य इद्रिस भाई, विनोद खारोडे, डॉ. खारोडे, अशोकराव मानखैर, बंटी पाटील, शिवाजी खारोडे, उस्मान पटेल, सुभाष मानखैर, मयूर खारोडे, सुधाकर चिंचोळकार, प्रमोद खारोडे, महादेवराव चिमणकार, रमेशराव खारोडे, अजय अरबट यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
ही निर्यात यशस्वी करून दाखविल्याबद्दल श्री. विलासराव खारोडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, तळेगाव बाजार हे केवळ उत्पादनासाठीच नव्हे तर निर्यातक्षम शेतीसाठीही पुढे येत असल्याचे सकारात्मक चित्र या घटनेतून समोर आले आहे.




