आवडत्या शिक्षकांच्या बदलीवेळी विद्यार्थी ढसाढसा रडले

आवडत्या शिक्षकांच्या बदलीवेळी विद्यार्थी ढसाढसा रडले
प्रतिनिधी – वाघाळा, योगेश काकड
जिल्हा परिषद शाळा, वाघाळा येथील आवडते शिक्षक ज्ञानेश्वर घुगे सर यांना काल (बुधवार) यांना निरोप देण्यात आला. सन 2006 ते 2025 या कालावधीत त्यांनी आपल्या सेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला.
गावातील नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने या निरोप समारंभाला उपस्थित होते. सरांचा तडफदार आणि प्रेमळ स्वभाव, तसेच एकच प्रश्न विद्यार्थ्यांना दोन-तीन वेळा समजावून सांगण्याची त्यांची वृत्ती सर्वांच्या मनाला भावली. निरोप घेताना “सर, तुम्ही जाऊ नका” असा अट्टाहास विद्यार्थ्यांनी केला आणि अश्रूंचा बांध फुटला.
ज्ञान देऊन माणूस घडवणाऱ्या घुगे सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी भावनिक काव्य ओवाळले –
> “ज्ञानाचा प्रकाश देण्या, विना अखंड तो जळतो
जीवनाचा अर्थ खरा, शिक्षकांमुळे कळतो
काय देऊ गुरुदक्षिणा, मनात माझ्या हुरहूर
आयुष्य दिलं तरी, फेडता येणार नाही गुरूचे उपकार.”
शेवटी सर्वांनी सरांचे योगदान व सेवाभावाची आठवण काढत भावुक वातावरणात त्यांना निरोप दिला.




