अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – प्रशासनाने तात्काळ जागे व्हावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
काल रात्री अचानक आलेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – प्रशासनाने तात्काळ जागे व्हावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
विशेष प्रतिनिधी सिंदखेड राजा
काल रात्री अचानक आलेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली, तर काही भागांमध्ये सतत १ ते १.५ तास पाऊस पडल्याने संपूर्ण सिंदखेडराजा तालुक्यात पाऊस झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
या अवकाळी हवामानामुळे उभे असलेले गहू पीक पाण्यात भिजून गेले असून अनेक ठिकाणी गहू आडवा पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गव्हाची गुणवत्ता घसरून पीक निकृष्ट दर्जाचे होण्याची शक्यता आहे. याशिवाय रब्बी व उन्हाळी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या परिसरात सुमारे 80% पर्यंत नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज असून शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून सतत निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र प्रशासनाकडून अजूनही अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असतानाही, शासनाने केलेल्या बदलांमुळे ऑनलाइन तक्रार नोंदवताना अडचणी येत आहेत. त्यामुळे नुकसान होऊनही शेतकरी विमा लाभापासून वंचित राहत आहे.
शेतकरी योद्धा कृती समितीच्या ठोस मागण्या:
तात्काळ पंचनामा (सर्वे) करून नुकसानीचे अचूक आकलन करावे
रब्बी व उन्हाळी पिकांसाठी त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी
मागील खरीप हंगामातील प्रलंबित पीक विमा तातडीने वितरित करावा
पीक विमा तक्रार प्रक्रिया सुलभ करून शेतकऱ्यांना त्वरित दिलासा द्यावा
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर योग्य भरपाई जाहीर करावी
जर राज्य सरकार व प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेतली नाही, तर शेतकरी योद्धा कृती समितीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात येत आहे. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.
शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.




