वाघजाईत अखंड हरिनाम सप्ताहाचा भक्तीमय सोहळा ७ जानेवारीला नामदेव महाराज शास्त्रींचे आगमन
भक्तीचा व संस्काराचा दीप उजळवणारा एक आगळा-वेगळा सोहळा वाघजाई येथे साजरा होत आहे.

वाघजाईत अखंड हरिनाम सप्ताहाचा भक्तीमय सोहळा
७ जानेवारीला नामदेव महाराज शास्त्रींचे आगमन
शेतकरी न्यूज संपादक बालाजी सोसे
सध्या शेतकरी अनेक अडचणींमध्ये सापडलेला असताना, खेड्यातल्या मातीशी नाळ जोडून भक्तीचा व संस्काराचा दीप उजळवणारा एक आगळा-वेगळा सोहळा वाघजाई येथे साजरा होत आहे.
श्री प.प. सद्गुरू वैकुंठवासी ह.भ.प. संत भगवानबाबा (भगवानगडकर) व वै. ह.भ.प. वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. ४ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत वाघजाई येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
हा सप्ताह पौष कृ. १ ते पौष कृ. ८ दरम्यान महंत भगीरथ महाराज बापू यांच्या शुभहस्ते संपन्न होत असून, पंचक्रोशीतील शेतकरी, मजूर, कष्टकरी बांधव मोठ्या श्रद्धेने यात सहभागी होत आहेत.
७ जानेवारीला नामदेव महाराज शास्त्रींचे वाघजाईत आगमन
या सप्ताहाच्या निमित्ताने दि. ७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ठीक २ वाजता न्यायाचार्य महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री (भगवानगड) यांचे वाघजाई येथे आगमन होणार आहे. त्यांच्या दर्शन व प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे.
शेतीवर अवलंबून असलेल्या या भागात, रोजच्या संघर्षातून थोडा वेळ भक्तीमध्ये रमण्याची संधी हा सप्ताह देत आहे. नामस्मरण, कीर्तन, प्रवचन व महाप्रसाद यामुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा
या सप्ताहात ह.भ.प. जनार्धन महाराज बोचरे, ह.भ.प. रमेश महाराज जायभाये, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे (जेहूर), ह.भ.प. सोपान महाराज शास्त्री (रिसोड), ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा) व आचार्य रामदास महाराज शास्त्री (भगवानगड) यांच्या कीर्तनसेवेचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
दररोज सकाळी काकडा, विष्णुसहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी संगीत रामायण कथा, सायंकाळी हरिपाठ, तर रात्री हरिकिर्तन व जागर असा भक्तीने भरलेला कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
११ जानेवारी रोजी काल्याच्या कीर्तनाने सांगता
दि. ११ जानेवारी २०२६, रविवार रोजी ह.भ.प. विवेकानंद शास्त्री महाराज (सिद्धेश्वर संस्थान, शिरूर कासार) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असून, त्यानंतर महाप्रसाद होईल.
शेतकरी परिस्थितीतही भक्तीची ज्योत तेवत ठेवणारा उपक्रम
दुष्काळ, कर्ज, उत्पादन खर्च, बाजारभाव अशा अनेक अडचणी असतानाही शेतकरी माणूस आपली संस्कृती, भक्ती आणि परंपरा जपत आहे. अशा परिस्थितीत खेड्यात होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह देश व राज्याला शेतकरी समाजाची आध्यात्मिक ताकद आठवण करून देणारा आहे.
या सप्ताहाचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, श्री संत भगवानबाबा मंदिर संस्थान वाघजाई व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




