जय जिजाऊजयंतीबुलढाणामहाराष्ट्रमहिलासावित्रीबाई फुलेसिंदखेड राजा

जिजाऊ जयंतीकडे शासनाचे दुर्लक्ष; मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक इशारा

१२ जानेवारीपर्यंत निर्णय नाही, तर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

जिजाऊ जयंतीकडे शासनाचे दुर्लक्ष; मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक इशारा

१२ जानेवारीपर्यंत निर्णय नाही, तर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

सिंदखेडराजा : राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाकडे शासन व प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिजाऊ जयंतीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत पालकमंत्र्यांनी एकही आढावा बैठक घेतलेली नाही, कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही, यावरून शासनाची उदासीनता स्पष्ट होते, असा आरोप राज्य समन्वयक महेश भैय्या डोंगरे पाटील यांनी केला.

“जिजाऊंच्या जन्मभूमीवर दरवर्षी लाखो जिजाऊ भक्त दर्शनासाठी येतात, मात्र त्यांच्या सोयीसुविधांसाठी कोणतेही ठोस नियोजन केले जात नाही. पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालये, पार्किंग, सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेचा पूर्ण अभाव आहे. इतिहास, श्रद्धा आणि जनभावनांचा असा अपमान सहन केला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे उत्खननात सापडलेली अकराव्या शतकातील भगवान विष्णू–लक्ष्मीची मूर्ती ही केवळ पुरातन ठेवा नसून अस्मितेचा प्रश्न असल्याचे सांगत, जिजाऊ भक्तांच्या ठाम विरोधामुळेच ही मूर्ती येथेच थांबली असल्याचा दावा मोर्चाने केला. १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवाच्या दिवशी ही मूर्ती दर्शनासाठी खुली करावी, अन्यथा मराठा क्रांती मोर्चा ती खुली करेल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले.

समृद्धी महामार्गावर राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व बाल शिवबा यांचा पुतळा तात्काळ उभारावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच मातृतीर्थच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये मंजूर होऊनही प्रत्यक्ष विकास का दिसत नाही, याबाबत शासनाने तात्काळ श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी मोर्चाने लावून धरली.

मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील श्रीमंत राजे लखुजीराव जाधव राजवाड्यात CCTV बंद असून ते तात्काळ दुरुस्त करावेत. राजवाड्यात नगरपालिकेमार्फत पर्यटकांकडून तिकीट वसुली सुरू असताना कोणत्याही सुविधा दिल्या जात नसल्याने तिकीट वसुली तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच आडगाव राजा येथील राजे लखुजीराव जाधवराव यांच्या राजवाडा परिसरात CCTV यंत्रणा बसवावी, अशीही मागणी मांडण्यात आली.

मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुका व शहरातील ऐतिहासिक वास्तूंची पडझड सुरू असताना पुरातत्त्व विभाग झोपेत आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. राजवाड्याची अधिकृत नोंद नसणे ही मोठी शोकांतिका असून, ही शासनाची गंभीर जबाबदारी असल्याचेही मोर्चाने नमूद केले.

मोर्चाने सरकारसमोर दहा मुद्द्यांचे सवाल ठेवले असून त्यामध्ये,जिजाऊंच्या जन्मभूमीसाठी स्वतंत्र राज्यस्तरीय मिशन कधी सुरू होणार?

मातृतीर्थला ऐतिहासिक पर्यटन स्थळाचा दर्जा कधी मिळणार?

समृद्धी महामार्गावरील पुतळ्यासाठी निधी कधी मंजूर होणार,तारीख जाहीर करा.

वारसा संवर्धनासाठी आलेल्या निधीचा गेल्या १० वर्षांचा हिशोब सार्वजनिक करा,

अशा ठोस मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जिजाऊ जन्मोत्सवाबाबत एकही बैठक न घेतल्याबद्दल तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला. १२ जानेवारी २०२७ पर्यंत समृद्धी महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांचे पुतळे उभारले नाहीत, तर अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा देण्यात आला. तसेच सिंदखेडराजा येथे पंढरपूर धर्तीवर शासकीय पूजा करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.

शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर मराठा क्रांती मोर्चा तीव्र आंदोलन छेडेल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी मराठा क्रांती मोर्चा व छावा संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव, निलेश देवरे, अतिश राजेश जाधव, गोविंद टेके, शिवा पुरंदरे, बाळासाहेब शेळके, दीपक किंगरे, संजय उगले, बाळासाहेब पाथरकर, निलेश देशमुख, बाबासाहेब पुरंदरे, दिगंबर शिंदे, देव्हडे पाटील, विठ्ठल चव्हाण, शंकर शिंदे,उत्तम राजे जाधव यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!