मंगरुळपीर तालुक्यातील अवैध खैर ११६ झाडांचे कत्तली, फीरते पथकाने १ लाख २० हजार घेतल्याची व्हिजिलन्स DFO समक्ष व्यापाऱ्याची कबुली
आर्थिक गैरव्यवहाराचे स्क्रीन शॉट पुरावासह

मंगरुळपीर तालुक्यातील अवैध खैर ११६ झाडांचे कत्तली, फीरते पथकाने १ लाख २० हजार घेतल्याची व्हिजिलन्स DFO समक्ष व्यापाऱ्याची कबुली
वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
आर्थिक गैरव्यवहाराचे स्क्रीन शॉट पुरावासह
जबाब नोंदविण्यासाठी गेलेले व्यापारी रफिक याने व्हिजिलन्स DFO यांना दाखवले आर्थिक गैरव्यवहाराचे स्क्रीन शॉट
मंगरूळपीर तालुक्यातील जुनापाणी शेतशिवारात दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी घडलेले बहुचर्चित खैर वृक्षतोड व तस्करी प्रकरण आता केवळ अवैध वृक्षतोडीपुरते मर्यादित न राहता, वनविभागातील फिरते पथकातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उघड भ्रष्टाचाराचे गंभीर वास्तव समोर आणणारे प्रकरण ठरत आहे. या प्रकरणात एकूण ११६ खैर जातीची मौल्यवान झाडे अवैधरित्या तोडण्यात आल्याचे अधिकृत पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे. खैर वृक्षापासून ‘कात’ तयार करण्यात येत असल्याने या लाकडाला काळ्या बाजारात प्रचंड मागणी असून, त्यामुळे या प्रकरणामागे संघटित तस्करीचे जाळे कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. खैर लाकडाने भरलेले वाहन पकडूनही सोडले! घटनेच्या दिवशी खैर लाकडाने भरलेले एक वाहन वनविभागाच्या फिरत्या पथकाने ताब्यात घेतले होते. मात्र, कायद्यानुसार कारवाई न करता सदर वाहन फिरते पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने सोडून देण्यात आले, अशी धक्कादायक बाब पुढे आली आहे. या वाहनास सोडण्यासाठी तब्बल १ लाख २० हजार रुपयांची लाच घेतल्याचा गंभीर आरोप संबंधित व्यापाऱ्याने केला होता. याबाबतचे सबळ पुरावे व लेखी निवेदन मुख्य वनसंरक्षक, यवतमाळ यांच्याकडे सादर करण्यात आले होते. मुख्य वनसंरक्षकांची तत्काळ दखल सदर निवेदनाची गंभीर दखल घेत मुख्य वनसंरक्षक, यवतमाळ यांच्या आदेशाने दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी उपविभागीय वनाधिकारी (SDO) हे त्यांच्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी करण्यात आलेल्या पाहणी व पंचनाम्यात जुनापाणी शेतशिवारात एकूण ११६ खैर वृक्षांची अवैध कत्तल झाल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले. यानंतर या प्रकरणात प्राथमिक गुन्हे अहवाल (POR) दाखल करण्यात आला. व्हिजिलन्स DFO समक्ष व्यापाऱ्याची धक्कादायक कबुली या खैर प्रकरणातील पुढील तपासाच्या अनुषंगाने दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी संबंधित व्यापारी रफिक याला व्हिजिलन्स DFO यांनी कार्यालयात बोलावून त्याचा जबाब नोंदविण्यात आला. यावेळी व्यापारी रफिक याने “फिरते पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माझ्याकडून १ लाख २० हजार रुपये घेतले” अशी स्पष्ट कबुली दिली. यामध्ये २० हजार रुपये रोख, १ लाख रुपये ‘फोन पे’द्वारे दिल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे, या आर्थिक गैरव्यवहाराचे स्क्रीनशॉट व डिजिटल पुरावे व्यापाऱ्याने थेट व्हिजिलन्स DFO यांना दाखविले, ज्यामुळे या प्रकरणातील भ्रष्टाचाराचे आरोप अधिकच ठोस झाले आहेत. वनविभागाच्या प्रतिमेला तडा या संपूर्ण प्रकारामुळे वनविभागातील फिरत्या पथकाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पर्यावरण रक्षणाची जबाबदारी असलेल्या विभागातील काही अधिकारीच तस्करांच्या मदतीने आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचा आरोप आता उघडपणे समोर आला आहे. कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष ११६ खैर झाडांची कत्तल, वाहन सोडण्यासाठी घेतलेली लाच, आणि त्याबाबतची थेट कबुली व डिजिटल पुरावे उपलब्ध असतानाही दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई होणार का, याकडे आता शेतकरी, पर्यावरणप्रेमी व नागरिकांचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण केवळ खैर वृक्षतोडीचे नसून, भ्रष्टाचाराविरोधातील वनविभागाच्या इच्छाशक्तीची कसोटी ठरणार आहे, असे बोलले जात आहे.




