दुसरबीडमधील अतिक्रमणधारकांची प्रशासनाकडे धाव; गाव नमुना ८ मध्ये नाव नोंदविण्याची मागणी
सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड शहरातील सरकारी जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या

दुसरबीडमधील अतिक्रमणधारकांची प्रशासनाकडे धाव; गाव नमुना ८ मध्ये नाव नोंदविण्याची मागणी
दुसरबीड (प्रतिनिधी – गजानन सोनुने)
: सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड शहरातील सरकारी जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी आपल्या निवासस्थानाच्या नियमितीकरणासाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. समस्त अतिक्रमणधारकांच्या वतीने तहसीलदार, तहसील कार्यालय सिंदखेडराजा तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देत जुन्या रहिवाशांची नावे गाव नमुना ८ मध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दुसरबीड शहरातील काही कुटुंबे अनेक वर्षांपासून सरकारी जागेवर वास्तव्यास असून त्यांनी त्या ठिकाणी घरे उभारून आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला आहे. मात्र अधिकृत नोंद नसल्यामुळे त्यांना अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाच्या नियमांनुसार दीर्घकाळ वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कायमस्वरूपी रहिवासी म्हणून मान्यता देऊन त्यांच्या नावांची नोंद गाव नमुना ८ मध्ये करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणामुळे ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा योजना, पाईपलाईन टाकणे, रस्ते बांधकाम तसेच वीज खांब उभारणी यांसारख्या मूलभूत सुविधांच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. जर जुन्या रहिवाशांना त्यांच्या जागेवर अधिकृत नोंद देण्यात आली तर ग्रामपंचायतीलाही विकासकामे राबविणे सुलभ होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
दरम्यान, ही मागणी नानासाहेब तोर फाउंडेशन भारत (एनजीओ) यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्यात येत असून प्रशासनाने नियमांनुसार या प्रश्नाचा सकारात्मक विचार करून दीर्घकाळ वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा अतिक्रमणधारकांनी व्यक्त केली आहे.
या निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासह संबंधित विभागांना पाठविण्यात आली आहे.
निवेदनावर नानासाहेब भिकाजी तोर, शे. फयुम शे. मस्जिद, सुरेश सुधाकर बुलकडे, शे. जावेद शे. हबीब आणि गजानन पुंजाजी सोनुने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




