भटपारचा वनवास संपवा; पक्का रस्ता देऊन गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणा

भटपारचा वनवास संपवा; पक्का रस्ता देऊन गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणा
जिल्हा प्रतिनिधी : तेजेश गुज्जलवार
महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भटपार गाव आजही मूलभूत विकासापासून वंचित आहे. स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही या गावाला पक्क्या रस्त्यासारख्या प्राथमिक सुविधेसाठी संघर्ष करावा लागत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. भटपार हे तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेले सीमावर्ती गाव असून, “सीमा भाग” असल्याचे कारण पुढे करून या गावाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे.
भटपार ते दर्भा आणि भटपार ते घोटपाडी हे अत्यंत महत्त्वाचे संपर्क रस्ते अद्याप मंजूर न झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात या गावाचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटतो. रस्त्याअभावी रुग्णवाहिका गावात पोहोचू शकत नाही, त्यामुळे आजारी रुग्ण, गरोदर महिला आणि अपघातग्रस्तांचे प्रचंड हाल होत आहेत. शाळकरी मुलांना चिखलातून, ओढे-नाले पार करत शिक्षणासाठी जावे लागत असल्याने त्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. तसेच शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारपेठेत नेणे अशक्य होत असून, आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
भटपार ते घोटपाडी या मार्गावर तर साध्या माती-मुरूम रस्त्याचीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या संपूर्ण परिस्थितीमुळे भटपार गाव विकासापासून कोसो दूर राहिले असून, गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन भटपार ते दर्भा आणि भटपार ते घोटपाडी हे दोन्ही रस्ते तात्काळ मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. केवळ कागदावर विकास नको, तर प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू झाले पाहिजे, अशी ठाम भूमिका भाकपचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी मांडली.
यावेळी किसान सभेचे कॉ. सत्तू हेडो, कॉ. सुरज जक्कुलवार आणि कॉ. रमेश कवडो यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, जर या दोन्ही रस्त्यांना तात्काळ मंजुरी देऊन काम सुरू करण्यात आले नाही, तर सीमावर्ती भागातील जनतेला सोबत घेऊन प्रशासन व लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.
आज भटपारचा विकास हा केवळ रस्त्याचा प्रश्न राहिलेला नसून, तो गावकऱ्यांच्या हक्कांचा आणि अस्मितेचा प्रश्न बनला आहे. भटपारचा वनवास संपवायचा असेल, तर पक्क्या रस्त्याशिवाय कोणताही पर्याय नाही, अशी ठाम भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
– जिल्हा प्रतिनिधी : तेजेश गुज्जलवार



