मॉ जिजाऊंना राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजांकडून मानाचे पूजन व महाआरतीने अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व स्वराज्य स्थापनेमागील महान प्रेरणास्थान असलेल्या राजमाता जिजाऊ माँ साहेब

मॉ जिजाऊंना राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजांकडून मानाचे पूजन व महाआरतीने अभिवादन
पत्रकार प्रतिनिधी : श्री भीमराव चाटे
सिंदखेड राजा | दि. १२ जानेवारी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व स्वराज्य स्थापनेमागील महान प्रेरणास्थान असलेल्या राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या ४२८ व्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथे अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पावन प्रसंगी राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजांच्या हस्ते मॉ जिजाऊंना मानाचे पूजन व महाआरती करून अभिवादन करण्यात आले.
राजे लखुजीराव जाधव यांचे सिंदखेड राजा व देऊळगाव राजा शाखेचे वंशज, देऊळगाव राजा येथील श्री बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव, युवराज्ञी मृणाल जाधव यांच्या हस्ते सकाळी ठीक ५.४५ वाजता राजवाड्यातील राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी असलेल्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून विधीवत पूजन करण्यात आले. यानंतर महाआरती व सहपरिवार पूजा संपन्न झाली.
या मानाच्या पूजन सोहळ्यासाठी जवळखेड, उमरद, मेहुणाराजा, आडगावराजा, किनगावराजा आदी गावांतील राजे लखुजीराव जाधव यांच्या सर्व वंशजांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्व वंशजांनी एकत्र येत मॉ जिजाऊंचे विधीवत पूजन करून अभिवादन केले.
राजेजाधव परिवाराच्या वतीने राजवाड्यात राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त प्रतिकात्मक पाळणा ठेवण्यात आला होता. या ठिकाणी उपस्थित वंशजांनी अंगाई गीते गात पारंपरिक पद्धतीने जन्मोत्सव साजरा केला. तसेच राजे लखुजीराव जाधव यांच्या राजदरबारातील प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
जिजाऊ जयंतीच्या औचित्याने संपूर्ण सिंदखेड राजा नगरीत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जिजाऊ भक्त व शिवप्रेमींनी शहरभर तोरणे, पताका लावून सजावट केली होती. राजे लखुजीराव जाधवराव, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची एकत्रित भव्य रांगोळी विशेष आकर्षण ठरली.
दरवर्षीप्रमाणे मराठा सेवा संघातर्फे आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवधर्म पीठावरील मुख्य कार्यक्रमात राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज राजे विजयसिंह जाधव यांची विशेष उपस्थिती लाभली.
या पावन सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह देशातील विविध भागांतून जिजाऊ भक्त मोठ्या संख्येने सिंदखेड राजा येथे दाखल झाले होते. राजमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारून गेला होता.




