शेलुबाजार येथील श्री सतीआई संस्थानात श्रीमद् भागवत सप्ताहाला भक्तीमय वातावरणात उत्स्फूर्त प्रारंभ
शेलुबाजार (ता. मंगरुळनाथ, जि. वाशिम) : येथील प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

शेलुबाजार येथील श्री सतीआई संस्थानात श्रीमद् भागवत सप्ताहाला भक्तीमय वातावरणात उत्स्फूर्त प्रारंभ
वाशिम जिल्हा प्रतिनिधी – विश्वास कुटे
शेलुबाजार (ता. मंगरुळनाथ, जि. वाशिम) : येथील प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सतीआई संस्थानाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत सप्ताहाला गुरुवार, दि. ५ मार्च २०२६ पासून अत्यंत भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला आहे. सप्ताहाच्या निमित्ताने शेलुबाजार तसेच परिसरातील गावांमध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून भागवत कथेचा लाभ घेत आहेत.
या सप्ताहात भागवताचार्य म्हणून व्यसनमुक्ती चळवळीचे प्रणेते मानले जाणारे व्यसनमुक्ती सम्राट मधुकर महाराज खोळे यांचे पुतणे ह.भ.प. पवन महाराज खोडे (आळंदीकर, ईसापुरकर ता. दिग्रस, जि. यवतमाळ) यांचे अत्यंत रसाळ, ओघवते व मार्गदर्शक भागवत कथन सुरू आहे. त्यांच्या प्रभावी शैलीतून श्रीमद् भागवत महापुराणातील विविध अध्यात्मिक प्रसंग, भक्तीचा महिमा, संतांच्या शिकवणी तसेच समाजाला दिशा देणारे विचार यांचे सखोल विवेचन केले जात आहे. त्यांच्या विचारांनी भाविक मंत्रमुग्ध होत असून दररोज मोठ्या संख्येने भाविक कथा श्रवणासाठी उपस्थित राहत आहेत.
यासोबतच मंगळवार दि. ३ मार्च ते बुधवार दि. ११ मार्च २०२६ या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. या पारायणासाठी व्यासपीठ सेवा ह.भ.प. ज्ञानदेव महाराज राऊत (नागी) व ह.भ.प. मुरलीधर महाराज नानोटे (दुबळवेल) यांच्या हस्ते पार पडत असून पारायणाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञानाचे विवेचन भक्तांना ऐकायला मिळत आहे. पारायणामुळे परिसरात भक्ती, श्रद्धा व अध्यात्मिकतेचे वातावरण अधिकच दृढ होत आहे.
सप्ताहानिमित्त दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत हरिकीर्तनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या किर्तनमालेत ह.भ.प. कृष्णा महाराज चौधरी, ह.भ.प. गणेश महाराज अधगण, ह.भ.प. शैलेष महाराज अवगण (सोयता), ह.भ.प. वामन महाराज महाले (जांभरूण महाली), ह.भ.प. संजय महाराज पोचपोर (अकोला) तसेच युवाकिर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जांगते (घोडी, जि. अहील्यानगर) यांची प्रभावी व भावस्पर्शी किर्तने होत असून भाविक त्याचा मोठ्या भक्तिभावाने आस्वाद घेत आहेत.
या धार्मिक कार्यक्रमात मृदंगाचार्य म्हणून ह.भ.प. गजानन महाराज दीपे (सायखेडा) तर चोपदार म्हणून ह.भ.प. सोहम महाराज काकडे (मेहकर) आपली सेवा बजावत आहेत. त्यांच्या सेवेमुळे कार्यक्रम अधिक शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडत आहे.
बुधवार दि. ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीमद् भागवत सप्ताहाची सांगता होणार असून सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगता व दीपोत्सवाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर श्री सतीआई गुरुदेव भजनी मंडळ, शेलुबाजार यांच्या वतीने पारंपरिक भजनाचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
तसेच गुरुवार दि. १२ मार्च रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत श्रीमद् भागवत ग्रंथ व ज्ञानेश्वरी ग्रंथाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत गावातील ग्रामस्थ, महिला, युवक तसेच भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत ह.भ.प. रामेश्वर महाराज उगले (काजळांबा) यांचे काल्याचे किर्तन होणार असून या किर्तनानंतर सायंकाळी ४ वाजता सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्री सतीआई संस्थान, शेलुबाजार यांच्या वतीने करण्यात आले असून गावातील ग्रामस्थ, भक्तगण, महिला मंडळ तसेच युवक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने परिश्रम घेत आहेत. सप्ताहाच्या निमित्ताने शेलुबाजार व परिसरात भक्ती, श्रद्धा व अध्यात्मिकतेचे वातावरण निर्माण झाले असून भाविक मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.




