नाशिक जिल्हा कृषी महोत्सव : “कृषी कुंभ २०२६” पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी
कृषी कुंभ २०२६ या भव्य कृषी महोत्सवातील कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून
नाशिक जिल्हा कृषी महोत्सव : “कृषी कुंभ २०२६” पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी
नाशिक/येवला – जिल्हा प्रतिनिधी : प्रवीण पाटील
कृषी कुंभ २०२६ या भव्य कृषी महोत्सवातील कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून या प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि विविध कृषी उत्पादने यांचा समावेश असलेल्या या प्रदर्शनामुळे संपूर्ण परिसरात कृषी क्षेत्राविषयी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कृषी प्रदर्शनामध्ये उमेद अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तूंचे आकर्षक स्टॉल उभारले आहेत. महिलांनी तयार केलेले घरगुती पदार्थ, हस्तकला वस्तू, तसेच ग्रामीण भागातील पारंपरिक उत्पादने यामुळे प्रदर्शनात विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. अनेक महिला बचत गटांनी पापड, लोणचे, चिक्की, मसाले, तसेच विविध घरगुती खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारून विक्री सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामीण महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याशिवाय अनेक कृषी कंपन्यांनी आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रीचे भव्य स्टॉल उभारले आहेत. यामध्ये कृषी पंप, ट्रॅक्टर, फवारणी यंत्रे, आधुनिक शेती उपकरणे तसेच विविध शेतीसाठी उपयुक्त साधनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळत असून उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या नव्या तंत्रांचा परिचय होत आहे.
या प्रदर्शनातील आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक. निफाड तालुक्यातील प्रगतशील महिला शेतकऱ्यांनी ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणीचे महत्त्व उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले. पारंपरिक पद्धतीने ब्लोअर किंवा हातपंपाने फवारणी करताना जास्त वेळ, पाणी आणि श्रम लागत असतात. मात्र ड्रोनच्या सहाय्याने केवळ दहा लिटर पाण्यात एका एकर क्षेत्रावर औषध फवारणी करता येते, त्यामुळे वेळ, श्रम आणि खर्च यांची मोठ्या प्रमाणात बचत होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुधारित शेती पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, तसेच व्यावसायिक शेतीच्या संधी याबाबत मार्गदर्शन मिळत आहे. विविध तालुक्यांमधील कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, रोपवाटिका अधिकारी, वन विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून माहिती घेत आहेत.
प्रदर्शन पाहण्यासाठी आयोजकांकडून बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमधून शेतकरी आणि नागरिक मोठ्या उत्साहात कृषी कुंभाला भेट देत आहेत. या प्रदर्शनाचा लाभ घेताना शेतकरी मयुर घोटेकर, समाधान सूर्यवंशी, माधव मढवई, रावसाहेब रोकडे तसेच कृषी सहाय्यक प्राजक्ता देशमुख यांनी कृषी प्रदर्शन पाहून आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत समाधान व्यक्त केले.
एकूणच, कृषी कुंभ २०२६ या कृषी महोत्सवामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळत असून शेती अधिक प्रगत आणि फायदेशीर करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


