गारपीटीने शेतकरी उद्ध्वस्त; सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत द्या – समीर भुजबळ
निफाड/येवला/लासलगाव, दि. २१ मार्च : अवकाळी पाऊस व गारपीटीच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे उभे पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले

गारपीटीने शेतकरी उद्ध्वस्त; सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत द्या – समीर भुजबळ
नाशिक/येवला प्रतिनिधी – प्रविण पाटील
निफाड/येवला/लासलगाव, दि. २१ मार्च : अवकाळी पाऊस व गारपीटीच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे उभे पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले असून, कांदा, द्राक्ष, मका, गहू यांसारख्या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच उत्पादन खर्चाच्या वाढत्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांवर या नैसर्गिक आपत्तीने दुहेरी संकट ओढवले आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणताही विलंब न करता सरसकट पंचनामे करून प्रत्येक बाधित शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी, अशी ठाम मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली आहे.
आज समीर भुजबळ यांनी निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर, कोटमगाव, खडक माळेगाव व वनसगाव परिसराला भेट देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आणि पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाल्याची वेदना स्पष्टपणे जाणवत होती. अनेक ठिकाणी द्राक्षबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या असून, कांद्याचे पिक सडून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
यावेळी त्यांनी दूरध्वनीद्वारे संबंधित तहसीलदारांशी संपर्क साधून “एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये” अशा स्पष्ट सूचना दिल्या. पंचनामे करताना विलंब, त्रुटी किंवा अन्याय होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, तसेच प्रत्यक्ष शेतात जाऊनच वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा, असेही त्यांनी बजावले.
शेतकऱ्यांनी यावेळी तीव्र भावना व्यक्त करत सांगितले की,
“दरवर्षी अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे आमचे नुकसान होते, पण मदत मात्र वेळेवर मिळत नाही. कर्ज, खत, बियाणे, मजुरी यांचा खर्च करूनही हाती काहीच राहत नाही. आता सरकारने तातडीने मदत देऊन आम्हाला दिलासा द्यावा.”
या पार्श्वभूमीवर समीर भुजबळ यांनी सांगितले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. शेतकरी हा देशाचा कणा असून त्याला संकटाच्या काळात एकटे सोडले जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
पाहणीदरम्यान टाकळी विंचूर येथील काशिनाथ राजोळे व मनोज काळे, कोटमगाव येथील सुधाकर गांगुर्डे व नवनाथ बिलोरे, खडक माळेगाव येथील दिलीप रायते तसेच वनसगाव येथील रावसाहेब शिंदे यांच्या शेतातील नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, दत्तात्रय रायते, दत्तूपंत डुकरे, सचिन दरेकर, पांडुरंग राऊत, विकास गोरे, राहुल डुंबरे, संतोष राजोळे, सोहेल मोमिन,इस्माईल मोमीन, मोहसिन शेख, सागर निकाळे, मोहन जावळे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच, या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, प्रशासनाने तातडीने सर्वसमावेशक पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा शेतकरी आर्थिक संकटात आणखी खोलवर ढकलला जाईल, अशी तीव्र भावना परिसरात व्यक्त होत आहे.


