आंदोलननाशिकमहाराष्ट्रमहिलासामाजिक कार्यकर्तेसोशल मीडिया

गावोगावी लबाड भोंदूबाबांना “गावबंदी” करा – नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत यांचा इशारा

राज्यात वाढत्या भोंदूबाबांच्या कारवायांमुळे सामान्य नागरिकांची फसवणूक

गावोगावी लबाड भोंदूबाबांना “गावबंदी” करा – नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत यांचा इशारा

    नाशिक | येवला प्रतिनिधी – प्रविण पाटील

राज्यात वाढत्या भोंदूबाबांच्या कारवायांमुळे सामान्य नागरिकांची फसवणूक, मानसिक छळ आणि आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, अशा लबाड आणि पाखंडी प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. “गावोगावी भोंदूबाबांना थारा देऊ नका, त्यांना थेट गावबंदी करा,” असा स्पष्ट आणि ठाम इशारा समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत यांनी दिला.

सध्या देशभर गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणातून धडा घेत, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र विशेष तपास पथक (एस.आय.टी.) स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारने तात्काळ द्यावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली. या मागणीसाठी समितीची धडक टीम नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

यावेळी नाशिक जिल्हाधिकारी यांच्याशी सकारात्मक संवाद साधण्यात आला. तसेच उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना लेखी निवेदन सादर करून भोंदूबाबांविरोधातील कारवाईसाठी पुढील नियोजनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या प्रसंगी समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत, महाराष्ट्र प्रदेश सचिव ज्योतीताई काजळे, तालुकाध्यक्ष सविताताई आहेर, समाजसेविका सुनंदाताई विस्पुते, प्राजक्ताताई कापडणे, जनसेविका रंजनाताई ढोली, नाशिक सचिव सुनीताताई गांगुर्डे, कलाध्यक्ष रेखाताई निकुंभ, प्राजक्ता राजगुरू, ज्येष्ठ नेते दिनेशजी पगारे, उपाध्यक्ष दुष्यंत वाघ, जनसेवक संजयनाना बलकवडे, राजाभाऊ सिरसाट, बिस्मिल्ला शेख, अभिजीत वाघ, श्यामभाऊ डावरे, कैलास चव्हाण, अशोक देवरे, राहुल साळवे, सुहास ठुबे, दिनेश खरे आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमोलभाऊ भागवत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की, “समाजात बुवाबाजी, भोंदूगिरी आणि अंधश्रद्धा यामुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत काही भामटे स्वतःचे जाळे तयार करून जनतेची लूट करत आहेत. याला आळा घालण्यासाठी केवळ कारवाई पुरेशी नसून व्यापक जनजागृती करणे अत्यावश्यक आहे.”

ते पुढे म्हणाले की, वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवणे ही काळाची गरज आहे. बुवा-बाबांच्या खोट्या दाव्यांमागील सत्य उघड करून नागरिकांना जागृत करणे आवश्यक आहे. अशा अनिष्ट प्रथांचा प्रसार, प्रचार किंवा जाहिरात करणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात यावी, तसेच यासाठी स्वतंत्र विजिलन्स अधिकारी नेमण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी ज्योतीताई काजळे, सविताताई आहेर, सुनंदाताई विस्पुते, प्राजक्ताताई कापडणे, संजयनाना बलकवडे आणि दुष्यंत वाघ यांनीही विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, आज सुशिक्षित तसेच ग्रामीण भागातील गरीब-श्रीमंत नागरिक देखील भोंदूगिरीच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे समाजातील सर्व स्तरांपर्यंत प्रभावी जनजागृती मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे.

विशेषतः ग्रामीण व शहरी भागात महिलांना संमोहन, अंधश्रद्धा किंवा भीती दाखवून शोषण केल्याच्या घटना वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे भोंदूबाबांचे फोफावलेले जाळे अधिक बळकट होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

समितीने राज्य सरकारकडे पुढील प्रमुख मागण्या मांडल्या –

प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र एस.आय.टी. स्थापन करावी

त्या पथकात पोलीस निरीक्षक व सहनिरीक्षकांचा समावेश करावा

संशयास्पद घटनांवर तात्काळ कारवाईसाठी विशेष अधिकार द्यावेत

भोंदूबाबांच्या जाहिरात व प्रचारावर बंदी आणावी

जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी

समितीने इशारा दिला की, जर यावर तात्काळ आणि ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर ही लबाड व भामटी मंडळी अधिक मोठे जाळे उभे करून जनतेची फसवणूक, अत्याचार आणि गैरव्यवहार करत राहतील. त्यामुळे प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!