वाशिम जिल्ह्यातील नगर पालिका निवडणूक—माहायुतीचा दबदबा; पाच पैकी चार ठिकाणी विजय, कारंजा लाडमध्ये एमआयएम आगे

वाशिम जिल्ह्यातील नगर पालिका निवडणूक—माहायुतीचा दबदबा; पाच पैकी चार ठिकाणी विजय, कारंजा लाडमध्ये एमआयएम आगे
वाशिम जिल्हा प्रतिनिधी—विश्वास कुटे
वाशिम जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यातील मतमोजणी संपन्न होताच राजकीय समीकरणे स्पष्ट झाली आहेत. जिल्ह्यातील पाचपैकी चार ठिकाणी महायुतीने आपली दमदार छाप निर्माण करत विजयी बाजू कायम ठेवली आहे. कारंजा लाड नगरपालिकेत मात्र एमआयएमने अटीतटीची लढत जिंकत आपला प्रभाव सिद्ध केला.
रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर आणि वाशिम येथे महायुतीचे उमेदवार आघाडीवर किंवा विजयी झाले असून, कारंजात एमआयएमच्या फरीदाबानो महमद शफी पुंजानी यांनी बाजी मारली आहे. महाविकास आघाडीला या सर्व निवडणुकांमध्ये एकही जागा मिळू शकली नाही.
रिसोड – भाजपचा प्रभावी विजय
रिसोड नगरपरिषद निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. भाजपाचे भगवानराव क्षीरसागर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब उर्फ सुधाकर देशमुख यांचा ९८२ मतांनी पराभव केला. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष उसळला. रिसोडच्या २३ नगरसेवक जागांमध्ये भाजपा ९, काँग्रेस ८, तर शिवसेना शिंदे गटाने ५ जागा पटकावल्या असून एक जागा अपक्षाच्या खात्यात गेली.
मालेगाव – शिंदे सेना आघाडीवर
मालेगाव नगरपंचायतीत शिंदे सेनेचे ओमप्रकाश खुरसडे विजयी झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मंगरूळपीर – राष्ट्रवादी (अजितदादा पवार गट) ची बाजी
मंगरूळपीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अशोक परळीकर यांनी भाजप उमेदवार डॉ. दिलीप रत्नपारखी यांचा पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध केले.
कारंजा लाड – एमआयएमचा प्रभावी विजय
कारंजा नगरपालिकेत एमआयएमच्या फरीदाबानो पुंजानी यांनी भाजपाच्या निशा गोलेच्छा यांच्याविरुद्ध कठीण लढत देत आपले स्थान पक्के केले आहे.
वाशिम – भाजपाचे उमेदवार आघाडीवर
वाशीम नगरपरिषद मतमोजणी अंतिम टप्प्यात असून भाजपाचे अनिल केंदळे हे उबाठा उमेदवार रेखा मापारी यांच्यापेक्षा आघाडीवर असल्याचे वृत्त लिहिपर्यंतचे संकेत आहेत.
महायुतीने जिल्ह्यातील चार नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवत राजकीय बळकटी साधली. महाविकास आघाडीला एकही नगराध्यक्ष पद न मिळाल्याने मोठा धक्का बसला आहे. मात्र रिसोड व मालेगावमध्ये काँग्रेसने नगरसेवकांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर मजबूत पकड दाखवली आहे.
रिसोडमधील विजय हा माजी खासदार अनंतराव देशमुख आणि शिवसेना नेत्या तसेच विधान परिषद सदस्य भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांसाठी मोठा सन्मान मानला जात आहे. दुसरीकडे स्थानिक काँग्रेस आमदार अमित झनक यांच्यासाठी या निकालाला अस्तित्वाची लढत मानली जात होती.
वाशिम जिल्ह्यातील नगर निवडणूक चित्र महायुतीच्या बाजूने झुकले असून, कारंजा नगरपालिकेत एमआयएमने अटीतटीची लढत जिंकून महत्त्वाचे यश मिळवले आहे. जिल्ह्यातील राजकीय वातावरण आगामी काळात आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.



