नरनाळा महोत्सव पोपटखेड अथवा शहानूर येथे साजरा करावा – डॉ. श्याम देशमुख
वंदे मातरम फाऊंडेशनची खासदार अनुप धोत्रे यांच्याकडे मागणी

नरनाळा महोत्सव पोपटखेड अथवा शहानूर येथे साजरा करावा – डॉ. श्याम देशमुख
वंदे मातरम फाऊंडेशनची खासदार अनुप धोत्रे यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी : विशाल गवई | अकोला जिल्हा अकोट :
अकोट तालुक्यात आयोजित करण्यात येणारा “नरनाळा महोत्सव” हा निश्चितच तालुक्याच्या गौरवात भर घालणारा उपक्रम आहे. मात्र या महोत्सवाचा खरा उद्देश आणि ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व जर यशस्वी करायचे असेल, तर हा संपूर्ण महोत्सव शहानूर अथवा पोपटखेड परिसरातच साजरा करण्यात यावा, अशी ठाम मागणी वंदे मातरम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्याम देशमुख (पोपटखेड) यांनी केली आहे.
या संदर्भात खासदार अनुप धोत्रे (भाजपा) यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. नरनाळा किल्ला, शहानूर जंगल परिसर व पोपटखेड हे क्षेत्र आदिवासी बहुल, नैसर्गिक संपत्तीने समृद्ध व ऐतिहासिक वारसा लाभलेले असल्याने महोत्सवाचे आयोजन याच भागात झाल्यास तो अधिक अर्थपूर्ण ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
डॉ. श्याम देशमुख यांनी सांगितले की,
“नरनाळा महोत्सवाचा उद्देश केवळ कार्यक्रमांचे आयोजन नसून, आदिवासी संस्कृतीचे जतन, वनसंवर्धन, किल्ले-दुर्ग दर्शन, जंगल पर्यटन आणि स्थानिक रोजगार निर्मिती हा आहे. हा उद्देश साध्य करायचा असेल तर महोत्सवाचे स्थळ शहानूर किंवा पोपटखेड परिसरातच असणे अत्यंत गरजेचे आहे.”
शहानूर व पोपटखेड परिसरात महोत्सव झाल्यास —
स्थानिक आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध होईल
आदिवासी कला, संस्कृती, परंपरा पर्यटकांपर्यंत पोहोचतील
नरनाळा किल्ला दर्शन, जंगल भ्रमंती, डोंगराळ दुर्गम भागातील जनजीवन जवळून अनुभवता येईल
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल
अकोटपासून शहानूर हे अंतर अवघे २२ किलोमीटर असल्याने वाहतुकीच्या दृष्टीनेही कोणतीही अडचण नाही. त्यामुळे या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून महोत्सवाचे आयोजन शहानूर अथवा पोपटखेड परिसरातच करण्याबाबत मा. जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून आवश्यक निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी उपस्थितांनी एकमुखाने केली.
या बैठकीस आमदार संजय गावंडे, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, राजूभाऊ नागमते, अॅड. मनोज खंडारे, दिलीप बोचे, डॉ. इंगोले, प्रभुदास तळोकार, विक्रम ठाकूर, गोपाल मोहोड, शिवराज कोरपे, पोपटखेडचे सरपंच विजेंद्र तायडे यांच्यासह अनेक सामाजिक, राजकीय व ग्रामस्थ प्रतिनिधी उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन डॉ. श्याम देशमुख यांनी केले होते. उपस्थित सर्वांनी एकमताने मत व्यक्त करत सांगितले की, नरनाळा महोत्सवाचा खरा आत्मा जपायचा असेल, तर तो नरनाळ्याच्या कुशीतच साजरा व्हायला हवा.




