पाणीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भवृक्षप्रेमी

सरोवर वाचवण्यासाठी लोणार शहर कडकडीत बंद

तातडीच्या उपाययोजनांची मागणी; प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात नागरिकांचा इशारा

सरोवर वाचवण्यासाठी लोणार शहर कडकडीत बंद

तातडीच्या उपाययोजनांची मागणी; प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात नागरिकांचा इशारा

       रघुनाथ आघाव | लोणार तालुका प्रतिनिधी

लोणार सरोवरातील सातत्याने वाढत असलेल्या पाणीपातळीमुळे निर्माण झालेल्या गंभीर संकटाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात दिनांक २८ जानेवारी रोजी लोणार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी वर्ग तसेच शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच लोणार शहरातील बाजारपेठा, दुकाने, खासगी आस्थापना पूर्णतः बंद ठेवण्यात आल्याने जनआंदोलनाचे तीव्र स्वरूप स्पष्टपणे दिसून आले.

गेल्या सहा महिन्यांपासून लोणार सरोवराच्या पाणीपातळीत सातत्याने व लक्षणीय वाढ होत असून यामुळे या अद्वितीय भू-वैज्ञानिक वारशाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. लोणार सरोवर हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील एकमेव उल्कापाताने निर्माण झालेले क्षारयुक्त सरोवर म्हणून ओळखले जाते. मात्र सध्याच्या परिस्थितीत सरोवराचा मूळ स्वभाव झपाट्याने बदलत असल्याने जागतिक वारशावर गंभीर संकट ओढावले आहे.

रासायनिक स्वरूपात धोकादायक बदल

सरोवराची पाणीपातळी सुमारे २० ते २५ फूटांनी वाढल्याने पाण्याचे रासायनिक संतुलन पूर्णतः बिघडले आहे. पूर्वी सरोवरातील पाण्याचा pH स्तर ११.५ इतका अत्यंत क्षारयुक्त होता. मात्र सध्या तो घटून ७.५ पर्यंत खाली आला आहे. त्याचप्रमाणे पाण्याची क्षारता (TDS) ६००० वरून अवघ्या ४०० पर्यंत घसरली आहे.

या बदलांमुळे सरोवरातील दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर असून, सध्या सरोवरात मासे उत्पन्न होऊ लागले आहेत. भविष्यात यामुळे अनियंत्रित व घातक जैवसृष्टी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जैवविविधता पूर्णतः नष्ट झाल्यास हे सरोवर सामान्य गोड्या पाण्याच्या तलावात रूपांतरित होईल, ज्याचा थेट फटका पर्यटन व्यवसायाला बसून लोणार शहराच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

धार्मिक व ऐतिहासिक वारसा पाण्याखाली

पाणीपातळी वाढल्यामुळे हिंदूंची कुलदेवी आई कमळजा माता यांचे अकराव्या शतकातील प्राचीन मंदिर, तसेच सोळाव्या शतकातील गैबनशहा वली यांची दर्गा आणि परिसरातील इतर अनेक ऐतिहासिक मंदिरे पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. मंदिरांच्या गर्भगृहात पाणी शिरल्याने मूर्ती, शिल्पे व वास्तूंना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून भाविकांच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या जात आहेत.

सांडपाणी व गोड्या पाण्यामुळे संकट वाढले

लोणार शहरातील सांडपाणी तसेच गोड्या पाण्याचे नैसर्गिक प्रवाह थेट सरोवरात मिसळत असल्याने सरोवराचे मूळ स्वरूप अधिकच बिघडत आहे. याबाबत केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश दिले होते. तसेच नगराध्यक्षा मीरा भूषण मापारी, काँग्रेस नेते भूषण मापारी, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ बच्छीरे, सचिन कापुरे यांच्यासह विविध पक्षांचे नेते व सामाजिक कार्यकर्ते सातत्याने या प्रश्नावर आवाज उठवत आहेत.

आंदोलकांच्या ठोस मागण्या

आंदोलकांच्या मागणीनुसार सरोवरात येणारे गोड्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत – धारतीर्थ, रामगया आदी – हे सरोवराच्या काठावरच अडवावेत. हे पाणी उपसा सिंचन व वॉटर लिफ्टिंग प्रणालीद्वारे लोणार शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी वापरावे. तसेच शहराचे सांडपाणी सरोवरात जाण्यापासून रोखण्यासाठी कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) तातडीने कार्यान्वित करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच पुरातत्त्व विभाग, वन्यजीव विभाग व महसूल विभाग यांच्या समन्वयातून मंदिर परिसरातील पाणी उपसण्यासाठी तातडीचे नियोजन करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर निवेदन

सरोवराच्या सद्यस्थितीवर आधारित प्रभाव अहवाल व उपाययोजनांचा सविस्तर मास्टर प्लॅन तयार करून तो तहसीलदार भूषण पाटील यांच्यामार्फत

जिल्हाधिकारी किरण पाटील, प्रधान मुख्य वनरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र शैलेंद्र डेहरवाल, डायरेक्टर जनरल ASI दिल्ली बहुबीर सिंग रावत, केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर (फ्रान्स) चे डायरेक्टर जनरल खालिद अल-एनानी यांना ई-मेल व प्रत्यक्ष निवेदनाद्वारे सादर करण्यात आला आहे.

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

तरीही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आंदोलनाचा पहिला इशारा म्हणून २८ जानेवारी रोजी लोणार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. येत्या काळात तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र, व्यापक व निर्णायक करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!