शेतकरी स्व. कैलास नागरे यांच्या बलिदानाला वर्ष पूर्ण – शिवणी आरमाळ येथे शोकसभा व आढावा बैठक
खडकपूर्णा धरणाचे पाणी शिवणी आरमाळ व परिसरातील १४ गावांना पाटाद्वारे मिळावे

शेतकरी स्व. कैलास नागरे यांच्या बलिदानाला वर्ष पूर्ण – शिवणी आरमाळ येथे शोकसभा व आढावा बैठक
पत्रकार श्री गजानन नागरे मेंडगव
खडकपूर्णा धरणाचे पाणी शिवणी आरमाळ व परिसरातील १४ गावांना पाटाद्वारे मिळावे आणि ते परिसरातील लघुप्रकल्पात सोडून शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी शासन दरबारी सातत्याने लढा देणारे व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून पुरस्कार प्राप्त शेतकरी नेते स्व. कैलास नागरे यांनी मागणीच्या पूर्ततेसाठी १३ मार्च २०२५ रोजी आत्मबलिदान दिले.
या दुर्दैवी घटनेला १३ मार्च २०२६ रोजी एक वर्ष पूर्ण होत असतानाही १४ गावांच्या पाण्याचा प्रश्न आजही प्रलंबित आहे, ही बाब अत्यंत संतापजनक आहे.
त्या वेळी राज्यातील अनेक नेत्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या.
Devendra Fadnavis यांनीही विधानभवनात नागरे कुटुंबाला न्याय देण्याची व त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी राज्य सरकार स्वीकारेल अशी घोषणा केली होती. परंतु आजपर्यंत ना पाण्याचा प्रश्न सुटला, ना कुटुंबाला न्याय मिळाला, अशी परिस्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर स्व. कैलास नागरे यांच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी तसेच त्यांच्या मागणीचे शासन दरबारी नेमके काय झाले याचा आढावा घेण्यासाठी
दि. १३ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शिवणी आरमाळ (ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) येथे शोकसभा व आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी
शेतकरी नेते लोकनायक प्रकाशभाऊ पोहरे,
सर्वोच्च न्यायालयाचे अॅडव्होकेट व विदर्भवादी अॅड. अविनाश काळे,
शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. बालाजी सोसे,
शेतकरी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री. गजानन जायभाये,
तसेच ज्येष्ठ शेतकरी नेते दिलीपभाऊ चौधरी उपस्थित राहणार आहेत.
स्व. कैलास नागरे यांच्या नेतृत्वाखाली शासन दरबारी लढा देणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून ही बैठक आयोजित करण्यात आली असून परिसरातील तसेच १४ गावांतील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन झुंजार शेतकरी मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे.
“शेतकऱ्यांसाठी दिलेले बलिदान वाया जाऊ देणार नाही – पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत लढा सुरूच राहील!”




