सिंदखेडराजा येथे 3 ते 12 जानेवारीदरम्यान सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवाचे आयोजन
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त

सिंदखेडराजा येथे 3 ते 12 जानेवारीदरम्यान सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवाचे आयोजन
प्रा. दिलीप नाईकवाड | बुलढाणा
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 3 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दहा दिवसांच्या उत्सवात विविध सांस्कृतिक, वैचारिक व प्रेरणादायी कार्यक्रम होणार असून समाजातील सर्व घटकांचा सहभाग अपेक्षित आहे.
या उत्सवाचे उद्घाटन सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते होणार असून नगराध्यक्ष सौरभ तायडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, डॉ. मनोहर तुपकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, तहसीलदार अजित दिवटे, देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, ठाणेदार आशिष इंगळे, मुख्याधिकारी आशिष बोबडे, गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर, गटशिक्षणाधिकारी स्वप्निल निकम यांच्यासह विविध शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक या उत्सवात सहभागी होणार आहेत.
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड तसेच विविध सामाजिक संघटनांच्या सहभागामुळे हा दशरात्रोत्सव वैचारिक जागृतीचे केंद्र ठरणार आहे. सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, स्त्री सक्षमीकरणाचा संदेश देणे आणि सामाजिक समतेचा विचार रुजवणे, हा या उत्सवामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजक समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

