प्रशासनावर मजबूत पकड असलेला लोकनेता अजित दादा काळाच्या पडद्याआड…!
अतिशय दुःखद, धक्कादायक घटना

प्रशासनावर मजबूत पकड असलेला लोकनेता अजित दादा काळाच्या पडद्याआड…!
अतिशय दुःखद, धक्कादायक घटना
नाशिक येवला प्रतिनिधी : प्रविण पाटील
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कणखर नेतृत्वाने, स्पष्टवक्तेपणाने आणि प्रशासनावरील मजबूत पकडीने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित दादा पवार यांचे आज विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक तसेच प्रशासकीय क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
अजित दादा हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते एक कर्तव्यदक्ष लोकनेते होते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जनसेवेसाठी झटणारे, शब्दाला जागणारे आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. सकाळी सहा वाजताच कामाला सुरुवात करून अधिकाऱ्यांनाही कामात गती आणणारा त्यांचा स्वभाव सर्वश्रुत होता. प्रशासनातील अधिकारी त्यांच्या कामाच्या शिस्तीमुळे नेहमीच सज्ज असायचे.
त्यांची भाषणे ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असे. मुद्देसूद, थेट आणि खुमासदार शैली हे त्यांच्या भाषणांचे वैशिष्ट्य होते. विरोधकांवर टीका करताना ते धारदार शब्द वापरत, मात्र कधीही वैयक्तिक पातळी ओलांडत नसत. हास्यविनोद करताना समोरच्याला निरुत्तर करण्याची त्यांची शैली लोकांमध्ये लोकप्रिय होती.
महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत अजित दादांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. सिंचन, पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, सहकार क्षेत्र यामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय दीर्घकाळ स्मरणात राहतील. कठोर निर्णय घेण्याची क्षमता आणि कामाचा धडाका हीच त्यांची खरी ओळख होती.
अजित दादांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राने एक अनुभवी, कणखर आणि जनतेशी नाळ जोडलेला लोकनेता गमावला आहे. ही हानी कधीही न भरून निघणारी असून त्यांच्या आठवणी कायम जनतेच्या मनात राहतील.
भावपूर्ण श्रद्धांजली…




