अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर थट्टा – पंजाबमध्ये हेक्टरी ₹50,000, महाराष्ट्रात फक्त ₹8,600!”

“अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर थट्टा – पंजाबमध्ये हेक्टरी ₹50,000, महाराष्ट्रात फक्त ₹8,600!”
ज्ञानेश्वर महादु मोरे
शेतकरी न्यूज तालुका प्रतिनिधी, लोणार
महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा सरकारी अन्यायाचा बळी ठरत आहेत. अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली फक्त हेक्टरी ₹8,600 इतकी नगण्य मदत सरकारने जाहीर केली आहे. याउलट पंजाब सरकारने आपदग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी तब्बल ₹50,000 रुपयांची मदत जाहीर करून खऱ्या अर्थाने दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारची मदत मात्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे.
विशेष म्हणजे, नुकसानीची खरी टक्केवारी लपवून पंचनाम्यांमध्ये फेरफार केले जात आहेत. बिबी मंडळ परिसरात तीन वेळा ढगफुटीसदृश्य पाऊस पडला, तरी अधिकाऱ्यांकडून “एका दिवसात 65 मिमी पावसाची नोंद नाही” असे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे न करता शेतकऱ्यांना टाळाटाळीला सामोरे जावे लागत आहे. अधिकारी वर्ग वरिष्ठांचे आदेश नसल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकत आहेत.
दरम्यान शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत भीषण आहे. महागडी खते, बी-बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके घेऊन कष्टाने पिकवलेले पीक पावसामुळे नष्ट झाले आहे. त्यातच रानडुक्कर व हरीण यांचा त्रास वाढला आहे. शेतकऱ्यांचे स्वप्न डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले असून ते अक्षरशः मृत्यूच्या छायेत जगत आहेत.
सरकार मात्र गेंड्याची कातडी पांघरून बसलेले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्ती, 100% पीकविमा अंमलबजावणी, दुष्काळग्रस्तांप्रमाणेच अतिवृष्टीग्रस्तांना मदत आणि पंजाबप्रमाणे न्याय्य नुकसानभरपाई मिळावी, या मागण्या वारंवार पुढे येत आहेत.
आज शेतकरी जगण्यासाठी झगडत आहे. जर तातडीने ठोस निर्णय घेतले नाहीत, तर आत्महत्यांचे प्रमाण वाढणार यात शंका नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंना न्याय द्यावा, अन्यथा जनतेचा प्रचंड उद्रेक सरकारला सहन करावा लागेल.



