सोलर पंप योजना कागदावर ठीक, प्रत्यक्षात शेतकऱ्यांची लूट! कंत्राटदारांच्या मनमानीमुळे शेतकरी संतप्त

सोलर पंप योजना कागदावर ठीक, प्रत्यक्षात शेतकऱ्यांची लूट! कंत्राटदारांच्या मनमानीमुळे शेतकरी संतप्त
बालाजी सोसे संपादक शेतकरी न्यूज
शेतकऱ्यांना दिवसाच्या वेळेत अखंड वीज मिळावी, सिंचन सुलभ व्हावे या उद्देशाने शासनाने सोलर पंप योजना सुरू केली. मात्र सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे बोगस व शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शेतकऱ्यांनी अर्ज करून लोकहिस्सा भरल्यानंतर पसंतीच्या कंपनीची निवड केली. कंपनी व महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षणही झाले. मात्र प्रत्यक्ष बसवणीच्या वेळी कंपनीचे कंत्राटदार शेतकऱ्यांकडून स्वतःच्या खर्चाने रेती, सिमेंट व गिट्टी मागत आहेत. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांवर हा अन्यायकारक अतिरिक्त खर्च लादला जात आहे.
इतकेच नव्हे तर सोलर पंप बसवताना आवश्यक खोलीचा खड्डा न खोदता फक्त अडीच ते तीन फूट खड्डा करून उर्वरित पाईप कापण्यात येत आहे. यामुळे कामाची गुणवत्ता निकृष्ट असून पंपाची मजबुती व भविष्यातील टिकाऊपणा धोक्यात आला आहे.
ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असताना काही कंत्राटदार व कंपन्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. संबंधित विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांवर लादलेला अन्याय दूर करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.




