एटापल्ली तालुक्यात खळबळजनक घटना
नवीन घराच्या शौच खड्ड्यात आढळले अनोळखी इसमाचे प्रेत
एटापल्ली | जिल्हा प्रतिनिधी : तेजेश गुज्जलवार
एटापल्ली शहरालगत असलेल्या नगर पंचायतच्या मागील भागात आज एक अत्यंत धक्कादायक व खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कुणाल तुदशीराम करमरकर यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असताना, घराच्या दुसऱ्या खोलीत तयार करण्यात आलेल्या शौच खड्ड्यात एका अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बांधकाम सुरू असलेल्या घराच्या परिसरात दुर्गंधी येत असल्याने पाहणी केली असता ही घटना उघडकीस आली. याबाबत तात्काळ एटापल्ली पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक गजानन साखरे हे आपल्या पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता, शौच खड्ड्यात निर्वस्त्र अवस्थेत अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले. प्राथमिक तपासात मृत्यू संशयास्पद असल्याचे संकेत मिळत असून, सदर घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. मृत इसमाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच हा मृत्यू अपघाती आहे की घातपात आहे, याबाबत सर्व शक्य त्या दृष्टीकोनातून तपास केला जात आहे.
पोलिस उपनिरीक्षक गजानन साखरे व त्यांची टीम सध्या पुढील तपास करत असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
एटापल्ली तालुक्यातील या खळबळजनक घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा.



