अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम वझर–आघाव–सावरगाव तेली पाणंद रस्त्यास मंजुरी
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम वझर–आघाव–सावरगाव तेली पाणंद रस्त्यास मंजुरी
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश
रघुनाथ आघाव लोणार तालुका प्रतिनिधी
लोणार तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वझर–आघाव–सावरगाव तेली पाणंद रस्ता अखेर मंजूर झाल्याने परिसरात समाधान व आनंदाचे वातावरण पसरले आहे. शेतीमाल वाहतुकीसाठी अत्यावश्यक असलेल्या या रस्त्याच्या मंजुरीमुळे शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर न्याय मिळाला आहे.
या रस्त्यासाठी शिवसेना लोणार तालुका संघटक संतोष उर्फ पिंटू भाऊ आघाव यांच्यासह शेतकरी नेते यांनी शेतकऱ्यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी शासन व लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रयत्नांना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर तसेच डॉ. संजय रायमुलकर यांनी वेळोवेळी भक्कम पाठबळ दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. पावसाळ्यात रस्ता चिखलात जात असल्याने शेतीमाल बाजारपेठेत नेणे अत्यंत कठीण, वाहनांचे नुकसान, अपघात आणि वेळेची नासाडी होत होती. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते.
या गंभीर प्रश्नाची दखल घेत मुख्यमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) मार्फत या रस्त्याला मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात एक किलोमीटर रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून उर्वरित टप्प्यालाही तातडीने मंजुरी मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या रस्त्यामुळे वझर, आघाव व सावरगाव तेली परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार असून बाजारपेठेपर्यंत पोहोचणे सोपे होईल. याचा थेट लाभ शेतकरी, विद्यार्थी, मजूर, कामगार व सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, शिवसेना तालुका संघटक संतोष उर्फ पिंटू भाऊ आघाव, शेतकरी नेते विलास विघ्ने व सरपंच संतोष साळवे यांनी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच संबंधित विभागाच्या मंत्र्यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सविस्तर माहिती देत तातडीच्या मंजुरीची ठाम मागणी केली होती. या भेटींचा सकारात्मक परिणाम होऊन शासन स्तरावर हालचालींना वेग आला आणि अखेर रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना तालुका संघटक संतोष उर्फ पिंटू भाऊ आघाव, शेतकरी नेते व शिवसेना नेते विलास विघ्ने, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, डॉ. संजय रायमुलकर तसेच सर्व संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
तसेच या विषयाला सातत्याने प्रसिद्धी देऊन शासनाचे लक्ष वेधणाऱ्या विविध वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या व माध्यम प्रतिनिधींच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. उर्वरित टप्प्याचे कामही लवकरात लवकर पूर्ण करून संपूर्ण रस्ता वाहतुकीस खुला करण्यात यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून या रस्त्यामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.




