सखारामपूर येथे संत सखाराम महाराजांचा ७९ वा पुण्यतिथी सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात संपन्न
संग्रामपूर तालुक्यातील पवित्र सखारामपूर नगरीत संत सखाराम महाराजांचा ७९ वा पुण्यतिथी सोहळा

सखारामपूर येथे संत सखाराम महाराजांचा ७९ वा पुण्यतिथी सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात संपन्न
प्रतिनिधी : राजेश पाटील खारोडे
संग्रामपूर तालुक्यातील पवित्र सखारामपूर नगरीत संत सखाराम महाराजांचा ७९ वा पुण्यतिथी सोहळा भक्ती, श्रद्धा व उत्साहाच्या वातावरणात मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. तीन दिवस चाललेल्या या भव्य यात्रेमध्ये पारंपरिक वारकरी संस्कृतीचे दर्शन घडले. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणत्याही प्रकारचा तमाशा, आर्केस्ट्रा किंवा चित्रपटगृहासारखे करमणुकीचे कार्यक्रम नसून, संपूर्ण यात्रा ही अध्यात्म, हरीनाम आणि वारकरी परंपरेला समर्पित होती.
या यात्रेत महाराष्ट्राच्या विविध भागांतून तब्बल २००१ पेक्षा अधिक वारकरी दिंड्यांचा सहभाग लाभला. २२ तारखेला सकाळपासूनच वारकरी आपल्या दिंड्या, टाळ-मृदुंगांच्या गजरात आणि हरीनामाच्या जयघोषात सखारामपूर येथे दाखल झाले. गावात प्रवेश करताच संपूर्ण परिसर ‘ज्ञानोबा-तुकाराम’ नामघोषाने दुमदुमून गेला.
२३ तारखेला मुख्य यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. वारकरी संप्रदायातील विविध संतांच्या पालख्या, भजन, कीर्तन, प्रवचन तसेच सामूहिक हरीनाम यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. गावकऱ्यांनी वारकऱ्यांसाठी अन्नदान, पाणी, निवारा यांची उत्तम व्यवस्था केली होती.
सखारामपूर संस्थानास “वराळाची काशी” म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी विशेषतः बहुजन समाजातील वारकरी मोठ्या संख्येने एकत्र येतात. यात्रेच्या तीन दिवसांत विविध धार्मिक, सांप्रदायिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संत सखाराम महाराजांनी आपल्या कीर्तनातून, अभंगातून व अध्यात्मिक विचारांतून समाज प्रबोधनाचे मोलाचे कार्य केले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथे दरवर्षी हरीनामाचा भव्य आणि शिस्तबद्ध सोहळा अनुभवायला मिळतो.
या संस्थानाची गादी सांभाळणारे गुरुवर्य ह.भ.प. तुकाराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानाचा कारभार अधिक व्यापक स्वरूपात विस्तारला आहे. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक वर्षांपासून गुरुवर्य गोपाळ महाराज व गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे मोलाचे योगदान लाभत आहे.
२४ तारखेला सकाळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने पुण्यतिथी यात्रा महोत्सवाची भक्तिभावात सांगता झाली. काल्याच्या कीर्तनानंतर वारकरी आपापल्या दिंड्यांसह आपल्या गावांकडे परतीच्या प्रवासाला निघाले. संपूर्ण यात्रा शांततेत, शिस्तीत आणि उत्साहात पार पडल्याने परिसरात समाधानाचे वातावरण होते.




