स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना अश्रुपूरित उजाळा; सिंदखेड राजात शोकसभा व अस्थिकलश दर्शनातून भावपूर्ण श्रद्धांजली
सिंदखेड राजा | दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ (मंगळवार) महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व प्रशासकीय जीवनावर

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना अश्रुपूरित उजाळा; सिंदखेड राजात शोकसभा व अस्थिकलश दर्शनातून भावपूर्ण श्रद्धांजली
शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा – रवी ढवळे
सिंदखेड राजा | दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ (मंगळवार)
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व प्रशासकीय जीवनावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे, जनतेच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज सिंदखेड राजा येथे माँ जिजाऊ जन्मस्थानासमोर शोकसभा व अस्थिकलश दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जनसागर उसळला असून संपूर्ण परिसर शोकाकुल व भावविवश वातावरणाने भारून गेला होता.
दि. २८ जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात स्वर्गीय अजितदादा पवार यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला. जनतेचा एक खंबीर आधारवड हरपल्याची भावना प्रत्येकाच्या मनात होती. शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, सामान्य नागरिक यांच्यासाठी ते नेहमीच हक्काचे नेतृत्व होते.
आज स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थिकलश सिंदखेड राजा येथे आणण्यात आला. माँ साहेब जिजाऊ यांच्या पवित्र जन्मस्थानी अस्थिकलशास वंदन करताना उपस्थितांचे डोळे पाणावले. इतिहास घडविणाऱ्या माँ जिजाऊंच्या भूमीत आज आधुनिक महाराष्ट्र घडवणाऱ्या नेतृत्वाला अखेरचा नमन करण्यात आला, हीच या क्षणाची सर्वात भावनिक बाब ठरली.
यानंतर सिंदखेड राजा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत शोकसभा पार पडली. सर्व उपस्थितांनी अत्यंत श्रद्धेने व शांततेत स्वर्गीय अजितदादांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
शोकसभेत बोलताना अनेक मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या की,
“अजितदादा हे केवळ राजकारणी नव्हते, ते जनतेचा आवाज होते. पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांनी माणसं जोडली. कठोर निर्णय घेणारा प्रशासक आणि संवेदनशील मनाचा नेता अशी दुर्मीळ सांगड त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती.”
स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत सिंचन, कृषी विकास, पायाभूत सुविधा, युवकांचे सक्षमीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न यासाठी ठोस निर्णय घेतले. अनेक वेळा टीकेचा सामना करतानाही त्यांनी कधीही जनहिताच्या भूमिकेत तडजोड केली नाही. त्यांच्या कार्यशैलीतील स्पष्टपणा, निर्णयक्षमता आणि धाडस आजही प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी आहे.
आजच्या शोकसभेत उपस्थित प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती—
“दादा गेले, पण त्यांच्या विचारांचा वारसा अजरामर आहे.”
या शोकसभेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह विविध पक्षांचे व संघटनांचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून न निघणारी असली, तरी स्वर्गीय अजितदादा पवार यांचे विचार, कार्य आणि जनतेवरील प्रेम कायम स्मरणात राहील, अशी भावना या शोकसभेतून व्यक्त झाली.
भावपूर्ण श्रद्धांजली…
भावपूर्ण निरोप…




