नगरपरिषदमहाराष्ट्रवाशिमविदर्भशेत रस्तेसामाजिक कार्यकर्तेसोशल मीडिया

कारंजा बस स्थानकात अवैध वाहतूक थांबे प्रवाशांसाठी डोकेदुखी

प्रशासन कुंभकर्ण झोपेत, नियमांची उघड उघड पायमल्ली

कारंजा बस स्थानकात अवैध वाहतूक थांबे प्रवाशांसाठी डोकेदुखी

प्रशासन कुंभकर्ण झोपेत, नियमांची उघड उघड पायमल्ली

       वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे

कारंजा येथील एस.टी. बस स्थानक (डेपो) हे तालुक्यासह परिसरातील हजारो प्रवाशांचे प्रमुख दळणवळणाचे केंद्र आहे. दररोज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत राज्यातील विविध भागांतून ये-जा करणाऱ्या एस.टी. बसेस, खासगी वाहने, प्रवाशांची सततची वर्दळ यामुळे बस स्थानक परिसर कायम गजबजलेला असतो. मात्र या गर्दीत शिस्त राखण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाकडून होत असलेली दुर्लक्षाची भूमिका आता प्रवाशांच्या अडचणी वाढवणारी ठरत आहे.

बस स्थानक परिसर ‘नो-पार्किंग झोन’ म्हणून घोषित असतानाही अनेक नागरिक आपल्या नातेवाईकांना आणण्यासाठी किंवा सोडण्यासाठी थेट स्वतःच्या दुचाकी, चारचाकी व ऑटो रिक्षांसह बस स्थानकात प्रवेश करतात. या वाहनांची सर्रासपणे चुकीच्या पद्धतीने उभी राहणे, थांबे करणे यामुळे परिसरात सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. परिणामी प्रवाशांना चालताना अडथळे येत असून, बस पकडण्यासाठी धावपळ करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवासी व विद्यार्थी यांना या अवैध थांब्यांमुळे बस स्थानकात प्रवेश करताना तसेच बाहेर पडताना जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागत आहे. काही वेळा तर वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढताना अपघात होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. इतकेच नव्हे तर एस.टी. महामंडळाच्या बसेसना देखील स्थानकात प्रवेश करताना किंवा वळण घेताना अडथळा निर्माण होत असून, त्यामुळे बस उशिरा सुटणे, वेळापत्रक कोलमडणे असे प्रकार वारंवार घडत असल्याचे चित्र दिसून येते.

या गंभीर परिस्थितीबाबत प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता संबंधित अधिकारी कार्यालयात अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. कोणतीही तत्काळ दखल न घेतल्याने प्रवाशांचा प्रश्न जशास तसाच कायम राहिला आहे. नियमांचे सर्रास उल्लंघन होत असतानाही कारवाईचा अभाव असल्याने प्रशासन ‘कुंभकर्ण झोपेत’ असल्याची तीव्र टीका संतप्त प्रवाशांकडून होत आहे.

बस स्थानकासारख्या संवेदनशील ठिकाणी वाहतूक शिस्त न राखली गेल्यास भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अवैध थांबे तात्काळ हटवणे, नो-पार्किंग झोनची काटेकोर अंमलबजावणी करणे, वाहतूक पोलिसांची नियमित नेमणूक करणे तसेच नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे अत्यावश्यक असल्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.

प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास प्रवाशांचा असंतोष अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील, असा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!