देऊळगाव राजाबुलढाणाभारत माता की जयमहाराष्ट्रसामाजिक कार्यकर्ते

सर्वसामान्य शेतकऱ्याला ध्वजारोहणाचा मान; त्याच दिवशी मुलाची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड

देऊळगाव राजा तालुक्यातील गोंदणखेड येथे १५ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन ठरला अभिमानाचा दिवस

सर्वसामान्य शेतकऱ्याला ध्वजारोहणाचा मान; त्याच दिवशी मुलाची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड

              विशेष प्रतिनिधी देऊळगाव राजा 

देऊळगाव राजा तालुक्यातील गोंदणखेड येथे १५ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन ठरला अभिमानाचा दिवस

देऊळगाव राजा तालुक्यातील गोंदणखेड येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्रामपंचायतीच्या सरपंच निलावती नारायण गीते, उपसरपंच लताबाई केशव मानटे आणि ग्रामसेवक मंदा शरद वाघ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक व शेतकरी विश्वनाथ नागोजी जायभाय यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. सर्वसामान्य शेतकऱ्याला राष्ट्रीय कार्यक्रमात हा मान देण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये अभिमानाचे वातावरण होते.

ध्वजारोहणानंतर जायभाये परिवाराच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटे, चॉकलेटच्या गोळ्या, पेन व वह्यांचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त लहान मुलांना खाऊ तसेच शैक्षणिक साहित्य देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

याच दिवशी ग्रामसभेत शेतकरी योद्धा कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष श्री. गजानन विश्वनाथ जायभाये यांची गोंदणखेड गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. नाव जाहीर होताच ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात निवडीचे स्वागत केले.

वडील विश्वनाथ नागोजी जायभाय यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि मुलगा गजानन विश्वनाथ जायभाये यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड, असा हा विशेष योगायोग ठरला. पिता-पुत्राला एकाच दिवशी मिळालेला हा सन्मान गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला.

यावेळी गजानन जायभाये भावूक होत म्हणाले, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आजपर्यंत संघर्ष केला आणि पुढेही तो सुरूच राहील. आता गावाने माझ्यावर तंटामुक्ती अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. या जबाबदारीचे भान ठेवून गावातील प्रश्नांसोबतच देऊळगाव राजा तालुका व बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विमा, अतिवृष्टी व इतर प्रश्न प्रशासनासमोर सातत्याने मांडत राहणार.”

गावकऱ्यांनी दिलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. जायभाये परिवाराच्या वतीने गोंदणखेड ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्यात शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक सदस्य श्री. देवानंद सोसे यांची शाळा शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर आता देऊळगाव राजा तालुक्यात गजानन जायभाये यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. दोन तालुक्यांत संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळालेला हा सन्मान शेतकरी योद्धा कृती समितीसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, गावातील शेतकरी, नागरिक, महिला मंडळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!