क्राइमबुलढाणाशेतकरी आत्महत्याशेतीशेती न्यूज

मलकापूर पांग्रा येथे शेतकऱ्याची आत्महत्या शासनाच्या अपयशी धोरणांचा आणखी एक बळी

राज्यातील शेतकरी संकट किती भयावह टप्प्यावर पोहोचले आहे याचे हे पुन्हा एकदा विदारक वास्तव आहे.

मलकापूर पांग्रा येथे शेतकऱ्याची आत्महत्या शासनाच्या अपयशी धोरणांचा आणखी एक बळी

       सिंदखेडराजा | प्रतिनिधी : भगवान साळवे

साखरखेर्डा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मलकापूर पांग्रा शिवारात एका कष्टकरी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून, राज्यातील शेतकरी संकट किती भयावह टप्प्यावर पोहोचले आहे याचे हे पुन्हा एकदा विदारक वास्तव आहे.

बाबुराव श्रीराम देशमुख (वय ६१), रा. मलकापूर पांग्रा, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आयुष्यभर शेतीत राबलेल्या या शेतकऱ्याने अखेर निराशेच्या गर्तेत अडकून स्वतःचे जीवन संपवले.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास बाबुराव देशमुख हे नेहमीप्रमाणे शेतातील मोटार सुरू करण्यासाठी घरातून निघाले होते. मात्र शेतात पोहोचल्यानंतर त्यांनी उंबराच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. ही घटना समजताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी मर्ग क्रमांक ३७/२०२५ कलम १९४ बीएनएसएस अन्वये नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार निवृत्ती पोफेळ करीत आहेत.

मृतकावर बँकेचे तसेच खासगी सावकारांचे कर्ज होते. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील उभे पीक पूर्णपणे नष्ट झाले होते. पीक विमा वेळेवर मिळाला नाही, शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नाही, कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि याच मानसिक तणावातून बाबुराव देशमुख यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती फिर्यादी अमोल संजयराव देशमुख यांनी दिली आहे. मृत्यूबाबत कोणताही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही.

मात्र येथे प्रश्न उभा राहतो — या शेतकऱ्याच्या मृत्यूस जबाबदार कोण?

निसर्ग की शेतकरी? की त्याचे कुटुंब?

नाही!

या मृत्यूस जबाबदार आहे संवेदनाशून्य शासन व्यवस्था, अपयशी कृषी धोरणे, वेळेवर न मिळणारा पीक विमा, कर्जमाफीच्या केवळ घोषणा आणि प्रत्यक्षात शेतकऱ्याला दिलेले दुर्लक्ष.

आजही शेतकरी संकटात असताना सत्ताधारी केवळ आकडेवारी मांडत आहेत. गावागावात शेतकरी आत्महत्या करत आहे, पण शासनाला त्याचे गांभीर्य नाही. बाबुराव देशमुख यांची आत्महत्या ही वैयक्तिक घटना नसून ती संपूर्ण व्यवस्थेवर असलेली गंभीर टिप्पणी आहे.

एकीकडे “शेतकरी राजा” असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यालाच मृत्यूच्या दारात ढकलायचे — हा दुटप्पीपणा आता थांबवायलाच हवा.

नाहीतर आज बाबुराव, उद्या आणखी कोणी…

आणि शासन मात्र जबाबदारी झटकत राहणार!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!