अपघातक्राइमगडचिरोलीग्रामीण रुग्णालय

गरोदर महिलेची सहा किमी पायपीट जीवावर एटापल्ली तालुक्यात गरोदर मातेचा व पोटातील बाळाचा दुर्दैवी अंत

जिल्ह्याच्या दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले

गरोदर महिलेची सहा किमी पायपीट जीवावर
एटापल्ली तालुक्यात गरोदर मातेचा व पोटातील बाळाचा दुर्दैवी अंत

एटापल्ली (गडचिरोली) : प्रतिनिधी – तेजेश गुज्जलवार

जिल्ह्याच्या दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मूलभूत आरोग्य सुविधा नसल्यामुळे एका निष्पाप जीवाला प्राण गमवावे लागणे, ही केवळ दुर्घटना नसून प्रशासनाच्या उदासीनतेचा कळस असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.
आशा संतोष किरंगा (वय २४) या नऊ महिन्यांच्या गरोदर होत्या.

परिसरात ये-जा करण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने १ जानेवारी रोजी त्यांना तब्बल सहा किलोमीटरची पायपीट करत जंगलातून, कच्च्या आणि खडतर रस्त्याने आपल्या नातेवाईकांच्या घरी जावे लागले. अवजड अवस्थेत केलेली ही पायपीट त्यांच्या जीवावर बेतली. अती शारीरिक त्रासामुळे प्रथम पोटातील बाळाचा मृत्यू झाला आणि काही वेळातच मातेनेही अखेरचा श्वास घेतला.
२ जानेवारी रोजी पहाटे प्रसववेदना तीव्र झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून हेडरी येथील कालीअम्माल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तात्काळ सिझेरियन शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला, मात्र वेळ निघून गेल्याने माय-लेकीला वाचवता आले नाही.
मृत्यूनंतरही फरफट कायम
प्रशासकीय संवेदनशून्यतेचे भयावह चित्र मृत्यूनंतरही पाहायला मिळाले. शवविच्छेदनासाठी मृतदेह एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला, मात्र तेथे स्त्रीरोगतज्ज नसल्याचे कारण देत मृतदेह तब्बल ४० किलोमीटर अंतरावरील अहेरी येथे पाठवण्यात आला. जिवंतपणी पायपीट आणि मृत्यूनंतर सरकारी व्यवस्थेच्या फेऱ्या — या संपूर्ण घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाची प्रतिक्रिया
या घटनेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले की, संबंधित गरोदर मातेची नोंदणी आशासेविकेमार्फत झाली होती. पायपीटमुळे अचानक गुंतागुंत निर्माण झाली असावी. डॉक्टरांनी प्रयत्न केले, मात्र यश आले नाही. संपूर्ण घटनेचा अहवाल मागवण्यात आला असून पुढील चौकशी केली जाईल.
सवाल उपस्थित
गडचिरोली जिल्ह्याला दोन मंत्री असताना आणि स्टील हब, विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत असताना एटापल्लीसारख्या दुर्गम भागात साध्या मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध नसणे, हा विकासाचा मोठा विरोधाभास असल्याची चर्चा आहे. दुर्गम भागातील गरोदर मातांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!