नाशिक येथे पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रियाचे उमेद अभियान उद्योजक सखींना एकदिवशीय शेतकरी प्रशिक्षण संपन्न..
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी व बचत गटातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने

नाशिक येथे उमेद अभियानांतर्गत उद्योजक सखींना एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण संपन्न

नाशिक | प्रतिनिधी – प्रवीण पाटील
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी व बचत गटातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने उमेद अभियानांतर्गत एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्योग भवन, सातपूर आयटीआय जवळ, त्र्यंबक रोड, सातपूर (नाशिक) येथे हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
महिलांनी स्वतःचा उद्योग सुरू करून स्वावलंबी व्हावे, आपल्या कुटुंबाचा आर्थिक आधार मजबूत करावा, या हेतूने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ग्रामीण भागातून आलेल्या महिलांनी या प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अनेक महिलांनी यावेळी उद्योग सुरू करण्याची शपथ घेतली.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCEDM), नाशिक यांच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले. उमेद अभियानातील महिला बचत गटांना शासनाच्या विविध उद्योग योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. PMFME, CMEGP, PMEGP अशा योजनांअंतर्गत कर्ज सुविधा व उद्योगासाठी मिळणारे ३५ टक्के अनुदान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात संजय निर्मळ सर यांनी कर्जप्रक्रिया, बँकांची कार्यपद्धती, आवश्यक कागदपत्रे याबाबत अत्यंत सोप्या व स्पष्ट शब्दांत माहिती दिली. तर अनिता बोरस्त यांनी महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचे फायदे व संधी यावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात कोणते छोटे उद्योग करता येतील, त्यासाठी लागणारा खर्च, अपेक्षित नफा-तोटा याबाबत सविस्तर चर्चा झाली.
या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन मोहिनी गांगुर्डे यांनी केले होते. त्यांनी आपल्या मनोगतातून महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, उद्योजकता विकास केंद्राचे उपक्रम सातत्याने सुरू राहतील असे सांगितले. प्रशिक्षणार्थी महिलांनी आयोजकांचे तसेच मार्गदर्शकांचे आभार मानले.
या प्रशिक्षणामुळे आम्हाला योग्य दिशा मिळाली असून आम्ही निश्चितपणे उद्योग सुरू करून यशस्वी उद्योजक होऊ, असा निर्धार उपस्थित सर्व महिलांनी व्यक्त केला. शासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण व गोरगरीब महिलांना आत्मनिर्भर होण्याची मोठी संधी मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.




