पालखी सोहळ्याचे मंचर शहरात उत्स्फूर्त स्वागत स्वराज्य संघाच्या वतीने शिवनेरी–पुरंदर ऐतिहासिक पालखी सोहळा
छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी

पालखी सोहळ्याचे मंचर शहरात उत्स्फूर्त स्वागत स्वराज्य संघाच्या वतीने शिवनेरी–पुरंदर ऐतिहासिक पालखी सोहळा
नाशिक (येवला) प्रतिनिधी : प्रवीण पाटील
छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक पिता–पुत्र भेटीच्या स्मरणार्थ शिवनेरी गड ते पुरंदर गड दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पालखी सोहळ्याचे सोमवारी मंचर शहरात नागरिकांच्या वतीने उत्स्फूर्त व जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या ऐतिहासिक पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या पालखी प्रस्थान सोहळ्याचा शुभारंभ संत तुकाराम महाराज यांचे वंशज मानिक महाराज मोरे, पंडित मोडक व उद्योजक रमेश ठेवले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी देवीची आरती व पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर पालखी सोहळा झाडाच्या पायथ्याशी येऊन पुढील प्रवासासाठी रवाना झाला.
स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव महाराज बांगर यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण पालखी सोहळ्याचे नियोजन व आयोजन करण्यात आले आहे. जुन्नर, नारायणगाव, कळम, एकलहरी मार्गे पालखी मंचर येथे दाखल झाली. मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वराज्य संघाचे अध्यक्ष बाबासाहेब दिघे, सचिव श्यामकांत निघोट, मारुती निघोट, वनाजी बांगर तसेच निघोटवाडी येथील ग्रामस्थांच्या हस्ते पालखीचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. पेठ येथेही नागरिकांनी मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
शुक्रवार, दिनांक ९ रोजी पालखी सोहळा पुरंदर गडावर दाखल होणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक पिता–पुत्र भेटीचा भावनिक व प्रेरणादायी सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव महाराज बांगर यांनी दिली.




