जिल्हा परिषद अध्यक्ष चषक बीटस्तरीय स्पर्धेत चिचोंडी बुद्रुक शाळेचे दैदीप्यमान यश
स्वामी विवेकानंद विद्यालय, एरंडगाव येथे देशमाने बीटाच्या वतीने आयोजित

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक बीटस्तरीय स्पर्धेत चिचोंडी बुद्रुक शाळेचे दैदीप्यमान यश
नाशिक | येवला प्रतिनिधी : प्रविण पाटील
स्वामी विवेकानंद विद्यालय, एरंडगाव येथे देशमाने बीटाच्या वतीने आयोजित जिल्हा परिषद अध्यक्ष चषक बीटस्तरीय क्रीडा व कला स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिचोंडी बुद्रुक या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली.
या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थिनी कु. सिमरन ललित गुंजाळ हिने १०० मीटर धावणे (लहान गट) या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या वेगवान आणि आत्मविश्वासपूर्ण धावण्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. तसेच कु. जान्हवी रवींद्र गुंजाळ हिने वैयक्तिक नृत्य (लहान गट) या कलाप्रकारात आपली कला सादर करत द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढविला.
या यशाबद्दल चिचोंडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. चंद्रशेखर दंडगव्हाळ सर यांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींच्या कर्तृत्वाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर विद्यार्थिनींच्या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक संतोष बुधवंत, उपशिक्षक सुनील बागले, शालिनी सुळ, मीना पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण परिश्रम लाभले. शाळेच्या वतीने तसेच शिक्षकवर्गाकडून या यशस्वी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील यशासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.




