सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा येथे संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त हजारो भाविकांना महाप्रसाद
सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा येथे संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त

सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा येथे संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त हजारो भाविकांना महाप्रसाद
वाघाळा (प्रतिनिधी – योगेश काकड):
सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा येथे संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सोमवारी झालेल्या या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त परिसरातील तसेच दूरदूरच्या गावांमधून हजारो भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.
संत भगवान बाबा हे ग्रामदैवतासमान मानले जात असून त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस वाघाळा गावासाठी श्रद्धा, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी संपूर्ण गावात चुली बंद ठेवण्याची परंपरा असून गावातील प्रत्येक कुटुंबाकडून प्रती घर ५०० रुपये वर्गणी गोळा करून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते.
पुण्यतिथीच्या सकाळपासूनच विविध धार्मिक विधी, पूजन व पिठाचे (प्रसादाचे) वाटप करण्यात आले. त्यानंतर महाप्रसाद वितरणास सुरुवात झाली. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, महिला-पुरुष मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. गावातील नागरिकांसह बाहेरील भाविकांनीही शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमामुळे गावात सामाजिक ऐक्य, सहकार्य आणि भक्तीभावाचे दर्शन घडले. कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी समान महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गावकरी, तरुण मंडळ तसेच स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित या महाप्रसाद कार्यक्रमामुळे वाघाळा गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ही परंपरा भविष्यातही अशीच अखंड सुरू राहावी, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.




