वाशिम जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन
काही क्षण असे असतात की टाळ्यांच्या गजरातही डोळे

वाशिम जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन
वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे
काही क्षण असे असतात की टाळ्यांच्या गजरातही डोळे नकळत ओलावतात, तर काही कथा सांगताना शब्दांसोबत श्वासही थरथरतो. वाशिम जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित अधिकारी-कर्मचारी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी उपस्थितांनी असाच एक अविस्मरणीय, काळजाला चिरून जाणारा अनुभव घेतला.
वाशिम जिल्हा परिषदेतर्फे आयोजित या बहुप्रतिक्षित क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. उद्घाटनानंतर विविध विभागांनी सादर केलेल्या आकर्षक व विषयप्रधान झाक्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सामाजिक संदेश, लोकसंस्कृती, प्रशासनातील कामकाज व जनजागृतीपर विषयांवर आधारित प्रत्येक झाकी लक्षवेधी ठरत होती. मात्र याच मिरवणुकीत एक झाकी अशी होती, जिने अवघ्या मैदानावर क्षणात गंभीर शांतता पसरवली आणि उपस्थितांचे मन सुन्न केले.
पंचायत समिती वाशिमच्या वतीने, गटविकास अधिकारी रवींद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेली ही झाकी होती — शहीद जवान अमोल गोरे यांच्या बलिदानाची जिवंत गाथा. या झाकीतील प्रत्येक कलाकाराने केवळ अभिनय केला नाही, तर जणू तो प्रसंग प्रत्यक्ष जगून दाखवला.
झाकीमध्ये सुट्टीवर गावी आलेल्या जवानाचा साधा, शांत पण अभिमानाने भरलेला संसार उलगडला जातो. आई-वडिलांचा आधार, पत्नीच्या डोळ्यातील अभिमान व काळजी, आणि दोन चिमुकल्या मुलांचे निरागस हास्य… काही दिवसांचा हा सोन्यासारखा काळ प्रेक्षकांच्या मनात घर करून जातो. मात्र कर्तव्याची हाक येते आणि देशसेवेपुढे वैयक्तिक सुख दुय्यम ठरते. आई-वडिलांचे आशीर्वाद, मुलांचे गोड हसू आणि पत्नीचा ओलावलेला चेहरा डोळ्यांत साठवत जवान सीमेवर निघून जातो.
क्षणातच दृश्य बदलते…
टीव्हीवर झळकणारी बातमी संपूर्ण वातावरण हादरवून टाकते —
देशाच्या सीमेवर झालेल्या चकमकीत वाशिमचा सुपुत्र अमोल गोरे शहीद.
तिरंग्यात गुंडाळलेली शवपेटी, आई-वडिलांचा हंबरडा, पत्नीचा धाय मोकलून फुटलेला आक्रोश आणि “आई, बाबा का उठत नाहीत?” अशी मुलांनी मारलेली आर्त हाक उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवते. बंदुकीच्या फैरीत शहीद अमोल गोरे यांना अखेरची मानवंदना दिली जाते. झाकी संपते… आणि संपूर्ण मैदान टाळ्यांच्या गजराने दुमदुमून जाते. मात्र ही टाळी आनंदाची नसून, अभिमान आणि अश्रूंनी ओलावलेली असते.
इतक्यात अँकरचा आवाज पुन्हा एकदा उपस्थितांचे मन सुन्न करतो —
“आज ज्या शहीद अमोल गोरे यांच्या शौर्याला आदरांजली वाहण्यात आली, त्यांच्या पत्नी आणि दोन लहान मुले आज या स्टेजवर प्रत्यक्ष उपस्थित आहेत.”
क्षणात टाळ्या थांबतात… श्वास अडकतो… डोळे भरून येतात.
ज्या वेदनेचा अभिनय पाहिला होता, ती वेदना प्रत्यक्ष समोर उभी राहते.
कार्यक्रमात उपस्थित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या हस्ते शहीद अमोल गोरे यांच्या पत्नी वैशाली अमोल गोरे व त्यांच्या अंदाजे ५ व ७ वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सत्कार स्वीकारताना वैशाली ताईंचा हुंदका पाहून उपस्थित अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
कार्यक्रम संपला, पण त्या झाकीतील दृश्ये, तो संवाद, तो आक्रोश आणि तो अभिमान उपस्थितांच्या मनात खोलवर कोरला गेला.
शहीद अमोल गोरे फक्त एका झाकीत नव्हते —
ते प्रत्येक ओलावलेल्या डोळ्यात, प्रत्येक थरथरणाऱ्या टाळीत आणि प्रत्येक भारावलेल्या मनात होते.
ही झाकी एकच ठाम संदेश देऊन गेली —
“देशासाठी शहीद होणे ही वीरतेची पराकाष्ठा आहे, पण त्या वीराच्या कुटुंबासोबत उभे राहणे हीच खरी देशभक्ती आहे.”
ही प्रभावी व हृदयस्पर्शी झाकी पंचायत समिती वाशिमचे गटविकास अधिकारी रवींद्र सोनवणे, गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड, प्रशासन अधिकारी स्वाती वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आली. झाकीचे दिग्दर्शन वाशिम जिल्ह्यातील हरहुन्नरी युवा अभिनेता किशोर कांबळे यांनी केले. यामध्ये पंचायत समितीतील शिक्षक-शिक्षिका, ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी तसेच विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रभावी भूमिका साकारत कार्यक्रमाला भावनिक उंची प्राप्त करून दिली.



