जय जवान जय किसानटॉप न्यूज़महाराष्ट्रशहीदशाळे कॉलेज

देऊळगाव राजा येथे लोकवर्गणीतून उभारलेले अमर जवान स्मारक – देशभक्तीचे भव्य प्रतीक

देऊळगाव राजा तालुक्यातील आजी-माजी सैनिक, पॅरा

देऊळगाव राजा येथे लोकवर्गणीतून उभारलेले अमर जवान स्मारक – देशभक्तीचे भव्य प्रतीक

  देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी : भीमराव चाटे

देऊळगाव राजा तालुक्यातील आजी-माजी सैनिक, पॅरा मिलिटरी व त्रिदलातील सैनिकांच्या संयुक्त प्रयत्नातून उभारण्यात आलेले अमर जवान स्मारक आज संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाचे प्रतीक ठरले आहे. आजी-माजी सैनिक मित्र फाउंडेशनच्या वतीने पोलीस मित्र, पत्रकार मित्र, वकील मित्र आदी सर्वांच्या सह्यानिशी नगरपरिषद देऊळगाव राजा येथे जागेसाठी अर्ज करण्यात आला होता. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरुणजी मोकळ यांनी या प्रस्तावाला मोलाची साथ दिली, तर प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी सदर जागेस मंजुरी देत अमर जवान स्मारकासाठी अधिकृत मान्यता दिली.
या संपूर्ण प्रक्रियेत मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले असून त्यांचे सैनिकांकडून विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशाच्या सीमेवर उभा राहून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या तालुक्यातील सैनिकांच्या देशभक्तीपुढे समाज मनापासून ऋणी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
जागा उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी अमर जवान स्मारक साकारण्याची जबाबदारी माजी सैनिकांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. कोणत्याही शासकीय निधीशिवाय, केवळ आजी-माजी सैनिक, पॅरा मिलिटरी सैनिक तसेच काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या लोकवर्गणीतून हे भव्य व दिव्य स्मारक उभे राहिले. ही बाब सैनिकांच्या समावेशक संघटनात्मक शक्तीचे जिवंत उदाहरण असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शहराच्या मुख्य ठिकाणी उभे असलेले हे स्मारक येणाऱ्या-जाणाऱ्यांना देशभक्तीची जाणीव करून देत असून प्रत्येकाचे मस्तक येथे आपोआप नतमस्तक होते.
अमर जवान स्मारकाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी आमदार मनोज कायदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देऊळगाव राजा हायस्कूलच्या एनसीसी कॅडेट्सने शिस्तबद्ध ड्रिल सादर केली. मान्यवरांच्या हस्ते स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्रगीत घेण्यात आले. स्मारकाच्या शेजारी उभारण्यात आलेल्या पंडालमध्ये हजारो सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ. गणेशदादा मांटे यांनी आतापर्यंत सैनिकांसाठी निशुल्क कार्यालय उपलब्ध करून दिले असून लवकरच हक्काचे सैनिक भवन साकारण्यात येईल, असे आश्वासन दिले. आमदार मनोज कायदे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. नगराध्यक्ष माधुरीताई तुषार शिपणे यांनी भविष्यात सैनिकांना कोणतीही अडचण आल्यास नगरपरिषद त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाला ठाणेदार ब्रह्मगिरी साहेब उपस्थित होते; मात्र इतर काही अधिकाऱ्यांची अनुपस्थिती सैनिकांना खटकली असून याबाबत खेद व्यक्त करण्यात आला. तसेच एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रण नव्हते, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली. पुढील कार्यक्रमांमध्ये अधिक नियोजन व सुधारणा केल्या जातील, असे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पदाधिकारी, मान्यवर, नागरिक व सैनिक कुटुंबीयांचे आभार आजी-माजी सैनिकांच्या वतीने मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!