अखंड हरिनाम सप्ताहजयंतीधर्मबुलढाणामहाराष्ट्रमहिलासिंदखेड राजा

प्रपंच करत असतानाच परमार्थ केला तरच जीवन पूर्णतृप्त – ह.भ.प. समा महाराज दौंडकर

प्रपंच करत असतानाच परमार्थ केला तरच जीवन पूर्णतृप्त – ह.भ.प. समा महाराज दौंडकर

        प्रा. दिलीप नाईकवाड | बुलढाणा

“भगवंताने तुम्हाला ज्ञान दिले, इंद्रिये दिली; मग गर्व कशाचा? प्रपंच करत असतानाच जर परमार्थ केला, तरच मानवी जीवन पूर्णतृप्त होते. आई-वडिलांच्या वाटण्याच्या कारणावरून त्यांची अवहेलना करू नका. जसे त्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, तसेच आपणही त्यांची सेवा व काळजी घ्यावी,” असे मौलिक व जीवनाला दिशा देणारे विचार महाराष्ट्रातील पहिले तृतीयपंथीय कीर्तनकार व पत्रकार ह.भ.प. समा महाराज दौंडकर यांनी व्यक्त केले.

ते जवळच असलेल्या मौजे सवडद (ता. बुलढाणा) येथे आयोजित त्रिदिवसीय श्री गणेश जयंती महोत्सव कार्यक्रमात कीर्तनाच्या माध्यमातून उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करत होते.

सवडद येथे दि. २० ते २२ जानेवारी दरम्यान तीन दिवस चाललेल्या श्री गणेश जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. दि. २१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता ह.भ.प. समा महाराज दौंडकर यांच्या सुमधुर व प्रबोधनात्मक कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

या कीर्तनप्रसंगी शिवसेनेचे युवा नेते श्रीनिवास खेडेकर, युवासेना नेते योगेश जाधव, साखरखेर्डा येथील माजी सरपंच महेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजरावबापू देशमुख, माजी समाजकल्याण सभापती बाबूराव मोरे, युवासेना तालुका प्रमुख संदीप मगर, माजी प्राचार्य डी.एन. पांचाळ, यादव गाडगे महाराज, सरपंच गजानन देशमुख, पत्रकार अशोक इंगळे, सचिन खंडारे, संदीप देशमुख, विनोद देशमुख, अरुण देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तब्बल दहा हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून श्री गणेश जयंती महोत्सवाची सांगता करण्यात आली.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दि. २० जानेवारी रोजी सकाळी गणेश पुराण कथाकार ह.भ.प. अशोक महाराज घायाळ यांनी तीन दिवस चालणारे गणेश पुराण सादर केले. त्याच दिवशी दुपारी मोफत वैद्यकीय तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

तसेच पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. दि. २१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंदारे यांनी “विद्यार्थ्यांचे कर्तव्य” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. यानंतर पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांचे प्रवचन झाले.

दि. २२ जानेवारी रोजी ह.भ.प. भरत महाराज जाधव यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता करण्यात आली. त्याच दिवशी नेत्र तपासणी शिबिरात निवड झालेल्या ५० गरजू नागरिकांना डॉ. भाग्यश्री श्रीनिवास खेडेकर यांच्या वतीने मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सचिन खंडारे यांनी केले. संपूर्ण उत्सवाचे यशस्वी आयोजन उत्सव समितीचे संतोष गाडेकर व सवडद ग्रामस्थांनी केले.

◾ महाप्रसाद विशेष :

दहा हजार भाविकांसाठी दहा क्विंटल पुरी व पाच क्विंटल वांग्याची भाजी असा महाप्रसाद तयार करून भक्तिभावाने वितरण करण्यात आले.

@ फोटो :

साखरखेर्डा – कीर्तन सेवा सादर करताना ह.भ.प. समा महाराज दौंडकर तसेच महाप्रसादाचे वितरण करताना मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!